सचिवपदी वृंदा गवंडळकर तर खजिनदारपदी दिपाली देसाई
नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण सोहळा संपन्न..
वेंगुर्ले : दाजी नाईक
महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि सामाजिक विकास यांना प्राधान्य देत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेंगुर्ले येथे लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला या संस्थेची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. ज्योती प्रसन्ना देसाई यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी सौ. वृंदा गवंडळकर व खजिनदारपदी डॉ. दिपाली देसाई यांची निवड करण्यात आली. उद्योजिका वेदिका विशाल परब यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
या फाउंडेशनच्या सदस्य म्हणून काजल गिरप, सौ. आकांक्षा परब, दिपाली अभ्यंकर आणि सौ. शुभदा नवार यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिला बचतगटांना प्रोत्साहन, महिला उद्योजिकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची प्रदर्शने व विक्री आयोजित करणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत, गुणवंत व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच महिला व मुलींसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याशिवाय पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन आणि आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा समाजोपयोगी उपक्रमांतही फाउंडेशन सक्रिय सहभाग घेणार आहे. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिलांच्या माध्यमातून समाजविकासाला हातभार लावणे, हे फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे, असे अध्यक्ष ज्योती देसाई यांनी सांगितले.













