आदिवासी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी भाजपचा पुढाकार!

अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के. नवी जिल्हा कार्यकारणी जाहीर

ठाकर व आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविणार! 

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत 

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासह त्यांच्या मूलभूत समस्या, हक्क आणि विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला आहे. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाची जिल्हास्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी साहित्यिक तथा जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मंगेश मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकर समाजासह जिल्ह्यातील विविध आदिवासी समाजघटकांपर्यंत भाजपचे संघटन पोहोचवून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात यापूर्वीही अनुसूचित जमाती मोर्चाची संघटनात्मक बांधणी करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता जिल्ह्यात मोर्चाची संपूर्ण रचना करण्यात आली असून जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस तसेच विविध मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्याही पूर्ण झाल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदिवासी वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचून संघटनेचे काम अधिक व्यापक केले जाणार आहे.

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हाभर जनजागृतीचा जागर!

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस ‘आदिवासी जनगौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरोधात ‘उलगुलान’चा लढा उभारणारे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आदिवासी वस्त्यांमध्ये प्रभातफेऱ्या, छोटे मेळावे, आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्ती, आदर्श शिक्षक, खेळाडू आणि साहित्यिकांचा गौरवही करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी नाग्या महादू वसतिगृह परिसरात स्वच्छता मोहीम राबवून भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ कट्टा, सावंतवाडी तालुक्यातील माणगाव, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि कणकवली तालुक्यातील आशिये येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान आणि गुणवंतांचा गौरव यांचा समावेश आहे.

पीएम जनमन योजनेसह आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर भर

आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातूनही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा कार्यभार असलेल्या प्रकल्प कार्यालयाची टीम सिंधुदुर्गात येऊन भाजप पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाडी-वस्त्यांमध्ये शासकीय व शैक्षणिक योजनांची माहिती पोहोचविणार आहे.

केंद्र सरकारच्या २४ हजार कोटी रुपयांच्या पीएम जनमन योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याबरोबरच आदिवासी बांधवांचे जात व जमातीचे दाखले, जात पडताळणी, जमीन हक्क आणि निवासाचे प्रश्न प्राधान्याने शासनदरबारी मांडण्यात येणार आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यावर भर राहणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विकासासाठी हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. केवळ संघटनात्मक बांधणी न करता आदिवासी बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाईल, असेही प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.