राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील ओणी माळीवाडी येथे शेतात आई सोबत गेलेल्या एका १२ वर्षीय शाळकरी बालिकेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना गुरूवारी घडली आहे. भातकापणीच्या कामादरम्यान खेळत असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे ओणी परिसरासह संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओणी माळीवाडी येथील रहिवासी असलेले दीपक जानू गितये यांची पत्नी देवयानी या गुरुवारी आपल्या दोन मुलांसह म्हणजे मुलगी गौरी आणि मुलगा जयेश यांना सोबत घेऊन शेतात भातकापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. शेतामध्ये देवयानी या भातकापणीचे काम करत असताना गौरी (वय १२ वर्षे) आणि तिचा भाऊ जयेश हे जवळच शेतात खेळत होते. खेळता खेळता सायंकाळच्या सुमारास अचानक गौरीला भोवळ आली आणि ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.
मुलगी अचानक खाली पडल्याचे लक्षात येताच आईने तातडीने आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिला सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तात्काळ ओणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले तरी उपचारादरम्यान सायंकाळी पावणेसात वाजता तिची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गौरी हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऐन दिवाळी-कापणीच्या दिवसांत खेळत्या-हसत्या १२ वर्षीय चिमुरडीचा असा अचानक डोळ्यादेखत अंत झाल्याने गितये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी मयत मुलीचे वडील दीपक जानू गितये यांनी दिलेल्या माहितीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.













