नरकासुर स्पर्धेत गोव्याच्या श्री देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड मंडळाचा डंका!

बांदा मर्यादित गटात श्री देव बनखनकर संस्थान कला-क्रीडा मंडळ काळसेवाडी – सुतारवाडी प्रथम

बांदा (प्रतिनिधी) :

 

पिंपळेश्वर मित्र मंडळ, देऊळवाडी-बांदा आयोजित भव्य नरकासुर स्पर्धेत खुल्या गटात गोव्यातील श्री देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत २५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक मिळविले. तर युथ सर्कल भिवंडा, पेडणे-गोवा मंडळाने १५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. बांदा मर्यादित गटात श्री देव बनखनकर संस्थान कला-क्रीडा मंडळ, काळसेवाडी-सुतारवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बांदेश्वर युवा मंडळाने द्वितीय, तर पाटेश्वर युवा मंडळ, आळवाडा-बांदा यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

 

या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच बाळू सावंत, जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, माजी उपसरपंच आबा धारगळकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, उद्योजक आप्पा चिंदरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, दीपक सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक गोकुळदास साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष आकाश सावंत, अक्षय परब, समीर कल्याणकर, सुनील माजगावकर, लवू परब आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्रमोद कामत यांनी मंडळाच्या सामाजिक व विधायक उपक्रमांचे कौतुक केले. गेली सलग आठ वर्षे पिंपळेश्वर मित्र मंडळाकडून नरकासुर स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध मंडळे आणि युवक एकत्र येतात. त्यामुळे समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी सरपंच प्रियांका नाईक, श्वेता कोरगावकर, बाळू सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये प्रथम पारितोषिक तेजस मेस्त्री, निरवडे यांना वॉशिंग मशीन, द्वितीय पारितोषिक किरण कदम, डिंगणे यांना फ्रिज, तर तृतीय पारितोषिक अमित पिळणकर, मोरगाव यांना कुलर देण्यात आला. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसांचेही वितरण करण्यात आले.

 

स्पर्धेचे परीक्षण देवेश मुळीक, गौरांग साळगावकर, साहिल परब आणि आशिष सावंत यांनी केले. यावेळी प्रशांत सावंत यांनी साकारलेली साईबाबांची हुबेहूब प्रतिकृती (स्टॅच्यू) हे स्पर्धेचे खास आकर्षण ठरले.

 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पत्रकार नीलेश मोरजकर, आबा धारगळकर, बाबा काणेकर, राकेश परब आणि गोकुळदास साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश सावंत, उपाध्यक्ष गौरव सावंत, सचिव रोहन सुपल, खजिनदार आशिष सावंत यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळाराम शिरोडकर व राकेश परब यांनी केले.

———-