गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे प्रतिपादन; मंडणगडमधील नळपाणी योजनेच्या श्रेयवादावरून स्थानिक राजकारण्यांना खोचक टोला
मंडणगड प्रतिनिधी : केवळ सत्ता हातात आहे म्हणून भूमिपूजनाचे कार्यक्रम करायचे आणि विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी कोणताही पाठपुरावा करायचा नाही, असे चालणार नाही. शहरातील जनता सुज्ञ आहे. नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन अन्य कोणीही करावे, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, या योजनेसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा कोणी केला, हे विरोधकांनाही माहीत आहे. मेहनत करणाऱ्यांना जनता योग्य वेळी श्रेय देते, अशा शब्दांत राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी मंडणगड येथील भूमिपूजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्थानिक राजकारण्यांना खोचक टोला लगावला. यावेळी पुढे बोलताना नामदार कदम म्हणाले की, स्थानिक पातळीवर नगरपंचायतीत बसून राजकारण करण्यामागे केवळ विकासकामांचे श्रेय घेण्याचा उद्देश दिसून येत आहे. स्थानिक नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नगरविकास मंत्र्यांकडे नळपाणी पुरवठा योजना अथवा अन्य विकासकामांसाठी कोणताही पाठपुरावा केलेला नाही. तसेच आरोग्यमंत्र्यांकडेही एकदाही पाठपुरावा केलेला नाही. उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीचे श्रेय लाटण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकारण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डायलिसिस सेंटर बंद पडू देणार नाही!
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील डायलिसिस सेंटर बंद पडू नयेत, यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. निधीअभावी ही सेंटर बंद पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. निधीबाबत निर्माण झालेली तांत्रिक अडचण लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव यांच्यासह दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













