गुहागरचा सोहम बावधनकर नासा दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना

गुहागर प्रतिनिधी:
गुहागरचा सुपुत्र सोहम बावधनकर हा नासा (NASA) दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. गुहागर सारख्या छोट्या गावातून या विद्यार्थ्याने नासापर्यंत झेप घेतल्याने संपूर्ण गुहागरमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

सोहमने १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबईहून एमिरेट्सच्या EK 509 विमानाने प्रस्थान केले. दुबईत ४ तास थांबून त्याने EK 219 विमानाने ऑर्लॅंडो गाठले. ऑर्लॅंडो येथील केनेडी स्पेस सेंटर येथे नासाच्या विशेष दौऱ्यात तो सहभागी होणार आहे.

या दौऱ्यात सोहम मियामी, लास वेगास, फ्रेस्नो आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांनाही भेट देणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी ऑर्लॅंडो ते मियामी, १७ नोव्हेंबर रोजी फोर्ट लॉडरडेल – नॅशविल मार्गे लास वेगास, १८ नोव्हेंबर रोजी फ्रेस्नो आणि १९ नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को असा त्याचा प्रवास असणार आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी आणि मॉन्टेरी बे अक्वेरिअमला तो भेट देणार आहे.

२३ नोव्हेंबर रोजी सोहम लॉस एंजेलिसहून दुबईमार्गे परतीच्या प्रवासाला निघणार असून २५ नोव्हेंबर रोजी पहाटे मुंबईत दाखल होणार आहे.

सोहमच्या या यशामुळे गुहागरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून, त्याच्यावर गुहागरवासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुहागरच्या तरुणांसाठी सोहम हा प्रेरणादायी ठरला आहे.