देवरूखच्या विलास रहाटेंची रांगोळी राज्यस्तरावर चमकली

शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या पोस्टरला रांगोळीतून साकारत पटकावला तृतीय क्रमांक; तब्बल २२ तासांची कलासाधना

देवरूख (प्रतिनिधी): 

कला, कल्पकता आणि जिद्दीच्या जोरावर देवरुखच्या सुपुत्राने राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. देवगड येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरुखचे रांगोळीकार विलास रहाटे यांनी सहभाग घेत ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर रांगोळीतून हुबेहूब साकारले. त्यांच्या या कलाकृतीला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाला असून देवरुखच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

युथ फोरम देवगड यांच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून ३४ कलाकारांनी सहभाग घेतला होता. यंदा स्पर्धेसाठी ‘फिल्म पोस्टर’ हा विषय निवडण्यात आला होता. जुन्या काळातील हाताने रंगविल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या पोस्टरची आठवण रांगोळीच्या माध्यमातून जागवण्याचा अनोखा प्रयत्न या स्पर्धेत करण्यात आला. विलास रहाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर रांगोळीतून साकारले. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल २२ तासांची मेहनत घ्यावी लागली.

प्रत्येक रंगाची अचूक निवड, बारकावे आणि चित्रातील जिवंतपणा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या कलाकृतीत पाहायला मिळाला. त्यांच्या या मेहनतीला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाच्या रूपाने यश मिळाले.‌

देवगड येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी या रांगोळी कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कलाकारांच्या कलाकृती रसिकांना पाहण्याची संधी मिळत आहे. केवळ २२ तासांची मेहनत नव्हे, तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाविषयीची निष्ठा आणि कलेप्रती असलेली समर्पणभावना विलास रहाटे यांच्या रांगोळीतून अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देवरुख परिसरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.