चौथ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होणार!

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने ठाणे शहापूर येथे १२ व १३ डिसेंबर रोजी आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : आंबेडकरी विचारांचा वारसा अंगीकारून साहित्य व्यवहारांमध्ये समस्त कोकणवासीयांची शिखर संस्था असलेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दि. १२ व १३ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटक म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली आहे. या संगीतीच्या अध्यक्षपदी यापूर्वीच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीधर पवार यांची निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष ज.वी. पवार यांनी दिली.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या केंद्रीय कमिटीची नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत चौथ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली. डॉ. प्रदीप आगलावे हे आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, संशोधक आणि वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला परिचित आहेत. ते नागपूर विद्यापीठात डॉ. आंबेडकर पदव्युत्तर विभागाचे २३ वर्षे प्रमुख होते. तसेच दीक्षाभूमीचे ते विश्वस्त देखील आहेत. सन २०२१-२५ या काळात महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य -सचिव होते. त्यांच्या कार्यकाळात डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे याचा २३ वा नवीन खंड प्रकाशित झाला. जनताचे एकूण दहा खंड, इंग्रजी खंड २, ४, ६, ९ आणि १३ या खंडांचा मराठी अनुवाद आणि १९ व्या खंडाच्या नवीन आवृत्तीइतके प्रचंड साहित्य डॉ.आगलावे यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन केवळ चार वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित केले आहेत. देश- विदेशात अनेक ठिकाणी त्यांची भाषणे झाली असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रदीप आगलावे यांची एकूण ३७ पुस्तके प्रकाशित झालेली असून तीन कादंबऱ्या, सतरा वैचारिक व संशोधनपर पुस्तके आणि १७ संपादित ग्रंथ यांचा समावेश आहे. दैनिक लोकमत, सकाळ , जनसंवाद आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहे. त्यांचे २ हजारपेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्याचा, विविध स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील अनेक साहित्य संस्थांचे, वेगवेगळ्या प्रकारचे, मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सम्यक साहित्य कला संगीतीच्या उद्घाटन सोहळ्याला यापुर्वी ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार, हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिषराय व नाटककार प्रेमानंद गज्वी यांची लक्षणीय उपस्थिती लाभलेली आहे. यावर्षी, डॉ. प्रदीप आगलावे यांच्या रूपाने या संगीतीचे लक्ष वेधले आहे.