जिल्हा परिषद अध्यक्षानी घेतले कट्टा येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
चौके प्रतिनिधी :-मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण होऊन सुख समृद्धीसाठी पांडुरंग चरणी साकडे घातले. तसेच हरिनाम सप्ताहावेळी वीणा, चीपळी घेऊन पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री संतोष साठविलकर, कट्टा येथील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक श्री. कांता भोगटे, कट्टा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रवीण गाड, मंदार मठकर, सागर माळवदे, अक्षय पावसकर, गणेश गाड, विनय मठकर, राजा पावसकर, जगदीश मोरजकर व अन्य उपस्थित होते. यावेळी विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष साठविलकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.












