महिला पोलिसांनाही धक्काबुक्की
मद्यधुंद अवस्थेत बाजारपेठेत महिलेचा गोंधळ
पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातच हाताच्या थापटाने मारहाण केल्याचा, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निशिगंधा दत्ताराम बागवे (वय अंदाजे ३०, रा. फातिमानगर, पुणे) असे संबंधित महिलेचे नाव असून, मद्यधुंद अवस्थेत कणकवली बाजारपेठेत आरडाओरड व शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल शंकर ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत त्यांची कणकवली पोलीस ठाण्यात डायल ११२ ड्युटी होती. रात्री ८.५३, ८.५४ आणि ९.०३ वाजता डायल ११२ प्रणालीवर संबंधित महिलेबाबत तीन तक्रारींचे कॉल प्राप्त झाले. महिला दारू पिऊन त्रास देत असून आरडाओरड करीत असल्याचे कॉलरने कळवून मदतीची मागणी केली होती. या कॉलनुसार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंबरे आणि ठाणे अंमलदारांचे मदतनीस पो.हे.कॉ पांडुरंग पांढरे यांनी ठाणे अंमलदार पो.हे.कॉ. मिलिंद देसाई यांना माहिती दिली. त्यानंतर रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास कणकवली बाजारपेठेतील पेट्रोलपंपाजवळ घटनास्थळी धाव घेतली. महिला संबंधित तक्रार असल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित महिला रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करीत होती. नागरिकांना शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करीत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या गोंधळामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली होती. महिलेच्या तोंडातून दारू प्यायल्यासारखा उग्र वास येत होता असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, कणकवली पोलीस ठाण्यातून महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता सावंत, रेश्मा कांबळे, स्नेहल बरगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंत्रे, सागर जाधव आणि श्रीकांत कुंभार घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. ती मोठमोठ्याने आरडाओरड करून नागरिकांना शिवीगाळ करीत होती. महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कांबळे आणि स्नेहल बरगे यांनी तिला शांत राहण्यास सांगितले असता, तिने दोघींनाही अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या शासकीय गणवेशाला हात घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना देण्यात आली. तेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित महिला कोणाचेही ऐकत नसल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला कणकवली पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही महिलेचा गोंधळ सुरूच होता. तिने पुन्हा मोठमोठ्याने आरडाओरड करून उपस्थित पोलिसांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पोलीस कर्मचारी तिला शांत राहण्यास सांगत असताना तिने प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या डाव्या खांद्याजवळ हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच महिला पोलीस हवालदार स्वप्नाली तांबे यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी संबंधित महिला पोलिसांना उद्देशून, मी फातिमानगर पुण्याची असून मला निशिगंधा दत्ताराम बागवे म्हणतात, मी तुम्हा सर्वांना बघून घेते, अशी धमकी देत होती. तसेच पोलीस ठाण्यात हातवारे करून अश्लील कृती करीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी शासकीय गणवेशात आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण, धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निशिगंधा बागवे हिच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११० व ११७, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१)(अ) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२१(१), १३२, २९६, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल करीत आहेत.













