प्रवाशांच्या समस्या जाणून घेत दिली कार्यवाहीची ग्वाही
पायभूत सुविधांसह अन्य महत्वपुर्ण प्रश्नांसाठी कोकण रेल्वे व केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे करणार पाठपुरावा
राजापूर (प्रतिनिधी): रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी मंगळवारी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील निवसर, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ व राजापूर या सहा रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. यावेळी उपस्थित प्रवाशांच्या समस्या व तक्रारी जाणून घेत आ. सामंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनातील उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. राजापूर तालुक्यातील विलवडे, सौंदळ व राजापूर स्थानकात भेट देद आ. सामंत यांनी पहाणी केली व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
सहाही रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या तातडीच्या मागणी असलेल्या पायापाभूत सुविधांबाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल व कार्यवाही केली जाईल, तर अधिक प्लॅटफॉर्म निर्मित, प्लॅटफॉर्मवर रूप फट उभारणी, गाडयांचे थांबे, आरक्षण कोटा वाढविणे याबाबत रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावले जातील अशी ग्वाही आ. सामंत यांनी यावेळी दिली. राजापूर रेल्वे स्थानकातील लिप्ट डिसेंबर अखेर पर्यंत सुरू होणार असून सरकत्या जीन्याचेही काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.
आ. सामंत यांनी कोकण रेल्वेच्या अधिकारी वर्गासह मंगळवारी सहाही रेल्वे स्थानकांची प्रत्यक्ष पहाणी करत तेथील अडचणींबरोबरच प्रवाशांच्याही समस्या व तक्रारी एकून घेत त्यांच्या निवारणाची हमी दिल्याने मतदार संघातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
लांजा आणि राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकांवरील सोयी-सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आ. सामंत यांनी मंगळवारी हा दौरा केला. राजापूर लांजा तालुक्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे, स्थानकांवरील मूलभूत सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था अशा प्रवाशांच्या तक्रारी व मागण्या होत्या.
प्रारंभी निवसर, त्यानंतर आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ व सायंकाळी राजापूर रेल्वे स्थानकाला आ. सामंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे प्रत्येक रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ. सामंत यांनी प्रत्येक रेल्वे स्थानकातील सुविधा व गैरसोयी याबाबत माहिती घेतली. कोकण रेल्वेचे उपमुख्य अभियंता संजय किल्लेदार, मंडळ वद्युत अभियंता सागर जोशी, शिवाजी शिंदे यांसह अधिकाऱ्यांनी आ. सामंत यांनी उपलब्ध सेवा सुविधा, रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेले काम व प्रस्तावीत कामे याबाबत माहिती दिली. यावेळी आ. सामंत यांनी स्थानकांवर प्रवाशांशीही संवाद साधला व निवेनदही स्विकारले.
स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा व अन्य प्राथमिक सुविधांबाबत रेल्वे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सुचना यावेळी आ. सामंत यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या. तर पायाभूत सुविधांबाबतही आपण सातत्याने पाठपुरावा करत असून त्याही योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जातील असेही आ. सामंत यांनी नमुद केले.
विलवडे, सौंदळ व राजापूर स्थानकावर काही गाडयांच्या थांब्याची मागणी, आरक्षण कोटा वाढविणे यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाबरोबरच रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. तर राजापूर रेल्वे स्थानकात आणखी एक प्लॅटफॉर्मची मागणी असून त्यावर फुटब्रीज यासाठीही पाठपुरावा करून हा प्रश्नही मार्गी लावला जाणार असल्याचे त्यांनी सांगतिले. राजापूर रेल्वे स्थानकावरिल लिप्ट डिसेंबर पर्यंत सुरू होणार असून सरकता जीन्याचेही काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदळ हॉल्ट स्थानकाचे स्थानकात रूपांतर करणे हा मुद्दा तेथील काही तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबीत असून त्यासाठीही आपण पाठपुरावा करणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे राजापूर स्थानक प्रमुख राहुल सावंत, पंकज कांबळे व अन्य अधिकारीही उपस्थित होते.
या पहाणी दौऱ्यात शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, रवींद्र नागरेकर, जिल्हा बँक संचालक मंदार सप्रे आदींसह राजापूर तहसीलदार विकास गंबरे, शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध प्रवाशी संघटनांसह पदाधिकारी यांनी आपल्या भागातील स्थानकांच्या समस्या व मागणीबाबत आ. सामंत यांना निवेदने दिली.















