परिसरात हळहळ; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवतीवाडी येथे एका ४५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. विलास दत्ताराम गावडे (वय- ४५) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याने आत्तमहत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास गावडे हा बुधवारी सकाळी गुरांना खायला घालायला जातो असे, सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो बराचवेळ झाला तरी घरी न आल्याने घरच्या मंडळींनी वाड्याच्या दिशेने जावून पाहिले असता विलास हा वाड्याजवळ असणाऱ्या फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. लागलीच त्यांनी विलासला देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डाँक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, विलास याची पत्नी विद्या गावडे हिने याबाबतची खबर साखरपा पोलीसांना दिली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून रितसर पंचनामा केला. व आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, विलासने आत्महत्येसारखा एवढा टोकाचा निर्णय का घेतला? याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस तपासात ते स्पष्ट होईल. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करीत आहेत. विलासच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.













