जनतेच्या समस्यांचे निराकारण करा अन्यथा गाठ माझ्याशी असा दिला ईशारा
पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत सर्वाधिक नाराजी
राजापूर प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावणे हेच प्रशासन आणि प्रशसनातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्राधान्य असले पाहिजे. मात्र काही अधिकारी वर्गाकडून यात होत असलेल्या दिरंगाई व बेफिकीरीबाबत आमदार किरण सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. आमसभेला अद्यापही सहा दिवस आहेत, त्या कालावधीत सर्व कामे, तक्रारी व समस्यांचे निराकारण करा अन्यथा गाठ आपल्याशी आहे असा सक्त ईशारा आ. सामंत यांनी गुरूवारी आमसभेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या काढावा बैठकीत कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या बैठकीत राजापूर व नाटे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर आ. सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राजापूर तालुक्याची आमसभा गुरूवारी २६ नोव्हेंबर रोजी शहरातील गुजराळी येथील श्रीमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आ. सामंत यांनी गुरूवारी प्रशासनाच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला सभापती नंदीनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, पोलीस निरीक्षक अमित यादव यादींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी आ. सामंत यांनी आमसभेत उपस्थित होणारे प्रश्न, प्रशासनाने केलेली तयारी याचा आढावा घेतला. तालुक्याची आमसभा असल्याने तालुक्यातील विविध प्रश्न या आमसभेत उपस्थित केले जातात, जनतेच्या प्रश्न व समस्यांचे निवारण करणे हे माझे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील याबाबत गंभीर असले पाहिजे.
उपसभापती अभिजित गुरव यांनी यावेळी पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनातील अनागोंदी कारभाराबाबत आ. सामंत यांच्याकडे कैफियत मांडली. यावेळी आ. सामंत यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. खून व चोऱ्यांच्या तपासात होणारी दिरंगाई, गोवा बनावटीची दारू विक्री विरोधात होत नसलेली कारवाई, सामान्य जनतेला पोलीसांकडून दिली जात असलेली वागणूक व नाहक त्रास देण्याचे होत असलेले प्रकार अशा राजापूर व नाटे पोलीस स्थानकांचा एकूणच कारभार या विरोधात जनतेतुन मोठया प्रमाणावर असलेल्या तक्रारींची दखल घेत या विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. सामंत यांनी चांगलेच फैलावर घेतले. कामकाजात सुधारणा करा, जनतेची कामे करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा ईशाराही आ. सामंत यांनी यावेळी दिला. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, सामाजिक वनिकरण, आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
आमसभा हे जनतेचे हक्काचे व्यासपीठ आहे, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, याचे भान ठेवा असे नमुद करत आ. सामंत यांनी सर्वच प्रशासकिय अधिकारी व विभागांना योग्य पध्दतीने कामकाज करण्याच्या सुचना केल्या. आमसभेत जनतेकडून येणाऱ्या तक्रारी, प्रश्न यांचे योग्य पध्दतीने निराकारण झाले पाहिजे याची खबरदारी घ्या अशा सुचनाही आ. सामंत यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले यांसह सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












