भोस्ते घाटात दोन कारची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांची तत्परता; जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

खेड प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी हे रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड येथून सावर्डेच्या दिशेने जाणारी अल्टो कार भोस्ते घाटात विरुद्ध दिशेने जात असताना चिपळूणवरून दापोलीकडे जाणाऱ्या एन्जॉय गाडीची तिच्याशी समोरासमोर धडक झाली. विशेष म्हणजे, भोस्ते घाटात एकदिशा वाहतूक व्यवस्था असतानाही अशा प्रकारे दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन जाण्याच्या प्रकारामुळे वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आनंद घोले यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले.
अपघाताच्या प्रसंगी कोणतीही वेळ न दवडता मदतीसाठी धावून जाणाऱ्या प्रसाद गांधी आणि आनंद घोले यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. एकीकडे एकदिशा वाहतुकीची व्यवस्था असताना दुसरीकडे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही या घटनेच्या निमित्ताने पुढे येत आहे.