उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने पर्यटक सुखावले
आंबा काजू बागायतींना फटका बसण्याची शक्यता
आंबोली : गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने हैराण झालेल्या आंबोली परिसरात शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. गार वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे संपूर्ण परिसर गारठला असून, सर्वत्र पसरलेले धुके आणि घाटातील दऱ्यांमध्ये उतरलेल्या ढगांच्या विलोभनीय दृश्यांमुळे आंबोलीचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाला असून, संपूर्ण परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका आंबोलीलाही बसला असून, येथील सर्वच जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. अशा कडक उन्हाच्या आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीत शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण केला. या अनपेक्षित बदलामुळे घाटमार्गातून गोवा आणि मालवणच्या दिशेने ये-जा करणारे प्रवासी व पर्यटक भारावून गेले. दाट धुक्यातून वाट काढत पर्यटकांनी ऐन उन्हाळ्यात मिळालेल्या या आल्हाददायक गारव्याचा मनमुराद आनंद लुटला.
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि गोवा परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांची (सायक्लोनिक सर्क्युलेशन) तीव्रता आता कमी झाली आहे. मात्र, ईशान्य मान्सून वाऱ्यांच्या तीव्र झोतामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानावर मोठा परिणाम झाला असून, पुढील दोन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंबा काजू बागायतीना फटका बसण्याची शक्यता
आंबोलीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. एकीकडे या पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला असला तरीही तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात नागरिक सुखावले असले तरीही आंबा व काजू बागायतीसाठी मात्र हा पाऊस नुकसानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसात पडलेल्या थंडीमुळे यावर्षी आंबा व काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती मात्र मध्येच पाऊस सुरू झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात आला आहे.












