केंद्रीय विद्यालय नाचणे येथे पहिली पालक-शिक्षक बैठक उत्साहात संपन्न

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
नाचणे येथील केंद्रीय विद्यालयात आज, शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यालयाची पहिली पालक-शिक्षक बैठक (PTM) अतिशय शिस्तबद्ध आणि संवादपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या बैठकीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण कुमार यांनी उपस्थित पालकांशी थेट संवाद साधला. विद्यालय सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते; त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक प्रगती अहवाल (प्रोग्रेस रिपोर्ट) पालकांसमोर सादर केला. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर शिक्षक व पालकांमध्ये सविस्तर सुसंवाद झाला.

याप्रसंगी, केंद्रीय विद्यालय संगठन ने (KVS) नव्याने सुरू केलेल्या संवाद ॲप’ (SAMVAAD App)बाबत पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना आता घरबसल्या आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती वेळोवेळी पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, गृहपाठ (होमवर्क) आणि शाळेतील इतर महत्त्वाच्या सूचनाही या ॲपद्वारे पालकांना सहज उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान पालकांनी आपल्या शंका मांडल्या, ज्यांचे प्रशासन व शिक्षकांकडून समाधानकारक निरसन करण्यात आले. तसेच, विद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी पालकांकडून अनेक सकारात्मक सूचना आणि मौल्यवान अभिप्रायही मिळाले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा संवाद अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.