राष्ट्रीय शिक्षण धोरण परिषदेत होणाऱ्या मंथनातून सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र घडेल- ना. धनंजय मुंडे

 

दापोली | प्रतिनिधी:- “भारतातील सर्वोत्कृष्ट कृषि विद्यापीठ हणून गणल्या गेलेल्या विद्यापीठात राष्ट्रीय शिक्षण धोरण निमित्ताने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून कृषि विकासावर मंचन होऊन चारही कृषि विद्यापीठे सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र घडवतील”, असा विश्वास राज्याचे कृषि मंत्री तथा प्रतिकुलपती ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पाव्दारे “महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांत राष्ट्रीय शैक्षणीक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत विश्वेश्वख्या सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत दूरदृश्यप्रणालीव्दारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे होते.

व्यासपीठावर राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. नवीन कुमार जैन, कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु अनुक्रमे डॉ. एस. एन. पुरी, डॉ. एस. एस. मगर, डॉ. एस. डी. सावंत, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख, डी. वाय. पाटील कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, तलसंदे, कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. प्रथापन, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, उपस्थित होते.

ना. मुंडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे आपले पहिले स्वतंत्र धोरण आखणारे राज्य असून आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील शिक्षणाची दिशा आणि दशा बदलण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे महत्वाकांक्षी पाऊल आहे. कृषि विद्यापीठातून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी शेतीत परत गेले पाहिजे, परंपरागत शेती करणे कालबाहय ठरवून शेतीला व्यवसाय म्हणून बघितल्यावर आणि उत्पादन खर्च कमी केल्यास शेतीमध्ये क्रांती घडेल. विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण सोपे होण्यासाठी आभासी तंत्रज्ञान वापरुन साधने विकसित केल्याने त्याचा छोट्या शेतकयाला, कृषि उद्योजकांना फायदा होईल. कृषि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पकता, नावीन्यपूर्ण संशोधन आणि त्यांचे स्वामित्व हक्क, संरक्षण अशा अनेक गोष्टी सुरुवातीपासून केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आपल्या चिंतनशील विशेष भाषणात डॉ. एस. एन. पुरी यांनी भारतातील कृषि शिक्षणाची सद्यस्थिती, संधी आणि आव्हाने यावर ऊहापोह केला. शिक्षणाचा दर्जा उंचावण्या अगोदर शिक्षकाचे संबधित विषयात प्रावीण्य असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षाच्या अभ्यासक्रमात पहिले वर्ष उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, दुसरे वर्ष उत्तीर्ण झाल्यावर पदविका, तिसरे वर्ष उत्तीर्ण झाल्यावर पदवी व चौथे वर्ष उत्तीर्ण झाल्यावर ऑनर्स पदवी द्यायला हवी, असे ते म्हणाले. पहिल्या वर्षीचे शिक्षण घेतल्यानंतर मिळालेल्या कौशल्यावर विद्यार्थी/विद्यार्थीनीला पैसे कमविता आले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. डॉ. भावे यांच्या कार्यकाळात विद्यापीठात या परिषदेचे उत्कृष्ठ परिणाम बघायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. संजय भावे म्हणाले की, आधी आपली शिक्षण पध्दती ज्ञान / कौशल्यावर आधारित होती. इंग्रजांच्या वर्चस्वामुळे ती आता माहिती अभिमुख झाली आहे. या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कोकणातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाकरीता करतील आणि ते रोजगाराभिमुख कृषि उद्योगाकडे देतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी कुलगुरु डॉ. संजय भावे, माजी कुलगुरु अनुक्रमे डॉ. एस. एन. पुरी, डॉ. एस. एस. मगर, डॉ. आर. बी.

देशमुख यांच्या हस्ते विविध मोडयुल्सचे दूरस्थ प्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आले. यावेळी अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने पुस्तकांच्या लेखकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल माळी यांनी केले. आभार डॉ. अतुल मोहोड यांनी मानले. या परिषदेला थायलंड, युएसए, मलेशिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय कीर्तिचे नऊ कृषि शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या चमूने विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीत मादर केले, यावेळी विद्यापीठातर्फे व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रक्रियायुक्त पदार्थाचे भेटवूस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सदर परिषदेला शास्त्रज्ञांची लक्षणीय उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.