रत्नागिरी: आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित सतरावा संगीत महोत्सवाचे आज थिबा पॅलेस येथे उद्घाटन होत आहे. यावर्षी हा महोत्सव *पंडित कुमार गंधर्व, पंडित सी आर व्यास आणि पंडित राम मराठे* या तीन दिग्गज कलाकारांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त साजरा करण्यात येत आहे, त्यामुळे या तीन दिग्गजांच्या पुढील पिढीचा संगीताचा वारसा रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाची सुरुवात पंडित राम मराठे यांचे नातू *भाग्येश मराठे* यांच्या गायनाने होईल. त्यांना तबला साथ *यशवंत वैष्णव* यांची असेल तर संवादिनी साथ रत्नागिरीचेच सुपुत्र *वरद सोहोनी* करतील. कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये दिलशाद खान यांचे सारंगीवादन सादर होईल. त्यांना तबला साथ *यशवंत वैष्णव* करतील.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 10 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सी आर व्यास यांचे गंडाबंध शिष्य *संजीव चिम्मलगी* यांचे गायन सादर होईल. त्यांना तबल्यावर साथ *कौशिक केळकर* यांची असेल आणि संवादिनी साथ *चिन्मय कोल्हटकर* करतील. यानंतर *ओडिसी नृत्यगुरू झेलम परांजपे* आणि त्यांच्या शिष्या रुपाली कदम यांचे ओडिसी नृत्य सादर होईल.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 11 फेब्रुवारी 2024 रोजी, पंडित कुमार गंधर्व यांचे नातू *भुवनेश कोमकली* यांचे गायन सादर होईल. त्यांना संवादिनीवर साथ *अभिषेक सिनकर* करतील आणि तबलासाथ *आशय कुलकर्णी* यांची असेल. पुढील सत्रामध्ये प्रसिद्ध सतारवादक *अनुपमा भागवत* यांचे सतारवादन सादर होईल. त्यांना तबला साथ *पंडित योगेश समसी* करतील.
आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे अशा पद्धतीने या तीन सादरीकरणामधून पंडित कुमार गंधर्व, पंडित सी आर व्यास आणि पंडित राम मराठे या तीन दिग्गज कलाकारांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मानवंदना देण्यात येणार आहे.
या तीनही दिवसांसाठी तिकीटविक्री ही थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. तसेच, आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी मेम्बरशिप योजना 2024 सालासाठी सुरू करण्यात आलेली असून त्यासंदर्भात अधिक चौकशीसाठी *+91 86690 82727* या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











