वनविभाग, कांदळवन कक्ष कासवमित्रांकडून २२३ घरट्यांचे संरक्षण, संवर्धन
चिपळूण दि.०२.०३.२०२४ भारताला तब्बल आठ हजार किलोमीटर लांबींची सागरी किनारपट्टी लाभली आहे. त्यापैकी महाराष्ट्राची किनारपट्टी ७२० किलोमीटर लांबीची आहे. ही सागरी किनारपट्टी जैवविविधतेन समृध्द आहे. समुद्रीजीवांपैकी समुद्री कासव हा एक महत्वपूर्ण सागरी जीव आहे. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात, या कासवांच्या जगभरामध्ये प्रमुख ७ प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील चार प्रजाती भारताच्या समुद्री किनाऱ्यावर आढळून येतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले कासव हे प्रसिध्द आहे. या कासवांचा तपकिरी रंग आणि एकत्रीतपणे एकाच हंगामात अंडी घालण्याचा पध्दतीमुळे त्यांचे नाव ऑलिव्ह रिडले पडले आहे.
या कासवाच्या माद्या दरवर्षी नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. ऑलीव्ह रिडले प्रजातीची मादी रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये खड्डा तयार करून एकाचवेळी अंडी घालते व समुद्रात पुन्हा निघून जाते. त्यामुळे कासवांच्या पिलांना पालकत्व मिळत नाही. अंडी घातल्यानंतर ती वाळूसऱ्यामध्ये नैसर्गिक तापमानावर उबवली जाता त्याकरीता ४५ ते ६० दिवसांचा कालावाधी लागतो परंतू मादीने अंडी घातल्यानंतर अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंच्या काळात भटकी कुत्री, लांडगे, कोल्हे, शिकारी पक्षी यांचे पासून त्यांना धोका असतो या कालावधीत ती असुरक्षित असल्याने त्यांचे संरक्षण व संवर्धन वन विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, कांदवळन कक्ष, कासवमित्र यांचेकडून केले जाते. याकरीता हॅचरीची निर्मिती करून अंडी सुरक्षीत केली जातात. हंगामाचे कालावधीत दररोज वनविभागाचे अधिकारी / कर्मचारी, कासव मित्र रात्रगस्त घालून घरटी शोधून त्यामधील अंडयांचे हॅचरीमध्ये संगोपन करतात,
यावर्षीच्या हंगामामध्ये गुहागर येथील मौजे गुहागर बाग व गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी दि.१६/१२/२०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान कासवमित्रांना ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या मादीने तयार केलेले पहिले घरटे आढळून आले, त्यानंतर दरोजच्या गस्तीमध्ये आज अखेर एकूण २२३ घरटी व त्यांमध्ये २३१९८ अंडी सापडली आहेत, या अंड्यांना मिळालेल्या ताखेनुसार हॅचरीमध्ये सुरक्षित करण्यात आली आहेत. ४५ ते ६० दिवसांचे संवर्धनानंतर ही पिल्ले घरट्यांमधून बाहेर येण्यास सुरूवात झाली असून दिनांक ०१.०३.२०२४ रोजी ३२१ कासवांची पिल्ले बाहेर पडली आहेत. ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम मार्च मध्ये सुरू होत असतो, मार्चच्या पहिल्याच तारखेस मोठ्या प्रमाणात पिल्ले बाहेर पडण्यास सुरूवात झाल्याने, कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणीमित्र यांचे मध्ये आनंदाने वातावरण निर्माण झाले आहे. ही जन्मलेली पिल्ले अथांग सागराकडे त्यांच्या अधिवासात मुक्त केली जातात. त्यांचे समुद्राकडे झेपावताने दृष्य हे नयनरम्य असते. हा सोहळा पाहण्यासाठी कासव महोत्सव आयोजित केला जातो. यामधून स्थानीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
मागील वर्षी सन २०२३ चे हंगामात गुहागर किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवांनी तयार केलेल्या घरट्यांची संख्या, दिलेली अंडी व जन्माला आलेली पिल्ले याबाबच्या आकडेवारीवरून पसंती दिल्याचे दिसून येत असून महाराष्ट्रामध्ये गुहागरने अव्वल स्थान पटकावले आहे. याही वर्षी गुहागर किनारा कासव संवर्धनामध्ये अव्वल स्थान पटकावेल असे विभागीय वन अधिकारी श्री. दिपक खाडे यांनी सांगितले असून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे हे ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवांनी मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी निवडणे हे तेथील स्थानिक, कासमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणिमित्र यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. कासव संवर्धनाचे कार्यास आता अधुनिक पध्दतीची जोड देण्यात आली असून कासवांच्या घरटयांच्या नोंदी, घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांची संख्या इत्यादी नोंदी एम टर्टल अॅपमध्ये घेण्यात येणार आहेत. कासवांच्या अंड्याचे तंत्रशुध्दपणे व प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन होणेसाठी हंगामाच्या सुरुवातीस कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत वन अधिकारी / कर्मचारी तसेच कासवमित्रांना कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात आले आहे









