आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे होणार स्मृतिदिन
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्या मंदिर चिवेली येथे शनिवार दिनांक २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्व. गोविंदराव शिर्के यांचा २६ वा स्मृतिदिन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी चिवेली आदर्श विद्यामंदिरामध्ये स्व. गोविंदराव शिर्के यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा केले जाते. संस्थेचे अध्यक्ष राजेश अनंत शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा स्मृतिदिन सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांनी तसेच विद्यार्थी पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के, शालेय समितीचे चेअरमन यशवंत शिर्के , व्हा. चेअरमन भाई कुळे, संस्था शाखा अध्यक्ष सुभाष शिर्के, सरचिटणीस प्रमोद साळवी, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी केले आहे.









