राजापुरात मृत्यु पश्चात शवविच्छेदनासाठी मृतदेहाची होतेय फरफट

 

 

वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन करावे लागतेय शवविच्छेदन

राजापूर l प्रतिनिधी : एकीकडे राजापूवासीयाना सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची स्वप्ने दाखविली जात आहेत. तर दुसरीकडे मात्र तालुक्यात आहे त्याच शासकिय रूग्णांलयांमध्ये अनेक सेवा सुविधांच्या अभावामुळे रूग्णांची परवड होताना पहावयास मिळत आहे. राजापूर तालुक्यातील रूग्ण सेवेची अवस्था तर एवढी भयानक आहे की मृत्युनंतरही एखाद्या रूग्णाच्या मरणयातना संपत नाहीत अशी परिस्थिती आहे. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदन गृहाचे काम सुरू असल्याने सध्या शवविच्छेदनासाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवले जात आहेत. मात्र या शवविच्छेदन गृहापर्यंत मृतदेह नेणाऱ्यांना आणि त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्याना तेथे पोहचण्यासाठी यातायात करावी लागत आहे.

 

ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या या शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन या ठीकाणी पोहचावे लागत आहे. त्यामुळे राजापूरात सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचा डंका पिटणाऱ्यांनी आणि आम्हीच जनतेचे कैवारी असा आव आणून श्रेयासाठी धडपडणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांनी जरा याचे देखील श्रेय घ्यावे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

राजापूर तालुक्यातील संपुर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तालुक्यात दोन ग्रामीण रूग्णालये, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४८ आरोग्य उपक्रेंद्र आहेत. अनेक ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता आहे. तर औषधांचाही अनेक ठिकाणी तुटवडा आहे. मात्र तरीही आहे त्याच परिस्थितीत या आरोग्य सेवेचा कारभार हाकला जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना ना खेद ना खंत अशी अवस्था आहे. केवळ पोकळ आश्वासने आणि बढाया मारण्यातच लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत. आता तर राजापूरात राजापूवासीयाना सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची सेवा देण्याची घोषणा झाली आहे व त्यासाठी जागा, निधीही मंजूर झाला आहे. सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल आवश्यकच आहे, पण जी आहे ती शासकिय आरोग्य सेवा कधी सुधाणार असा जनतेचा सवाल आहे.

 

राजापूरात अनेक अपघाती, आत्महत्या, विषबाधा व अन्य कारणांनी होणाऱ्या मृत्युमुळे त्या मृतदेहाचे शवविच्छेदन शासकिय रूग्णालयात करावे लागते. राजापूर ग्रामीण रूग्णालयात ते केले जाते. सध्या राजापूर ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छदेन गृहाचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे मग राजापूर पासून सात किलो मिटरवर असणाऱ्या ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात असे मृतदेह शवविच्छदेनासाठी न्यावे लागत आहेत. मात्र ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छदेन गृहापर्यंत पोहचण्याचा मार्गच मुळी भयानक असा आहे. गर्द वाढलेली झाडी, शवविच्छेदन गृहाला वेढलेले जंगल, आणि रस्त्यावर पसरेलेले चिखलाचे साम्राज्य यामुळे तिथपर्यंत पोहचताना नातेवाईक आणि वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन रस्ता शोधत जावे लागत आहे. कधी एखादा साप अथवा जनावर बाहेर पडेल व आपल्यावर हल्ला करेल अशी भिती मनात कायम आहे. तर मृत्युनंतरही त्या मृतदेहाची शवविच्छेदनासाठी अशी परवड होत आहे.

 

याही अवस्थेत काही दिवसापुर्वी दोन मृतदेहांचे शवविच्छेदन राजापूरातुन ओणी येथे जाऊन राजापूर ग्रामीण रूग्णालयातील एका वैद्यकिय अधिकाऱ्यांने केले आहे. मात्र इथली एकूणच परिस्थिती पाहिल्यावर त्यावर मात करत या डॉक्टरने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने नातेवाईकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. मात्र निवडणूक जवळ आल्याने अनेक गोष्टींचे श्रेय घेऊ पहाणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांनी जरा याचे देखील श्रेय घ्यावे अशा संतप्त प्रतिक्रीया जनतेतुन उमटत आहेत. राजापूरकरांना सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल द्याच पण आहे त्या सेवा तरी किमान सुधारा अशी जनतेची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींच्या संवेदना बोथड झाल्या असतील तर किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी याकडे गांभीर्याने पहावे अशी जनतेची मागणी आहे.