राजापूर (प्रतिनिधी): महिलांच्या सक्षमिकरणासाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. आमाच्या माय भगिनींना संसारात हातभार लागावा म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली व आता महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रूपये जमा होऊन ही योजना प्रत्यक्षात पुर्ण झाली आहे. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पुर्ण करणारे आमचे महायुती सरकार असून भविष्यात या सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राजापूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष किरण सामंत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत शनिवारी ओणी येथे गजानन मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार सौ. शितल जाधव, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, लांजा तालुका प्रमुख राजू कुरूप, पक्ष निरिक्षक संदेश पटेल, भरत लाड, महिला आघाडीच्या प्रभावती कानडे, राजापूर शहर अध्यक्ष सौरभ खडपे आदींसह प्रशासकिय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना किरण सामंत यांनी महिलांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होऊ लागले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे व आधार बँकेशी लिंक नसल्याने ज्या महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांचाही हप्ता लवकरच जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे सरकार हे काम करणारे सरकार आहे त्यामुळे भविष्यातही अनेक योजना आपल्याला राबवायच्या असून ठामपणे महायुती सरकारच्या ठामपणे पाठीशी उभे रहा असे आवाहन सामंत यांनी केले.
याप्रसंगी काही लाभार्थी महिलांसह सीआरपी, अंगणवाडी सेविका महिलांनीही मनोगत व्यक्त करत महायुती सरकारला धन्यवाद दिले.
यावेळी किरण सामंत व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिला, सीआरपी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी व या योजनेच्या अंमलबजावणीसाठी परिश्रम घेणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील लाभार्थी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.












