देवगड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा आंबा बागायतदार,शेतकरी,यांचे मोठे नुकसान ; खुडी येथे दोन गुरे दगावली

७१ मिलीमीटर पावसाची नोंद ; एप्रिलमध्ये पाऊस झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने आंबा बागायतदार, शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान केले आहे. खुडी येथे वीज पडून जर दोन जनावरे दगावली तर जामसंडे येथील देशपांडे यांच्या घरावर वीज पडून सुमारे ८८,५०० विद्युत उपकरणे जळाली. तब्बल ७१ मिमी पावसाची नोंद झाली असून,या पावसामुळे आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता बागायतदार व्यक्त करत आहेत.

खुडी येथील शेतकरी मिलिंद घाडी यांनी आपल्या गोठ्यात बैल बांधले होते. मात्र, सकाळी पाच वाजता मुसळधार पावस आणि त्यात झालेल्या विजेच्या कडकडाट मध्ये गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने दोन बैल जागीच दगावले, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच जामसंडे टिळक नगर येथे नितीन भालचंद्र देशपांडे यांच्या घरावर वीज कोसळली, त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यात सुमारे ८८,५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंबा हंगाम अगदी उंबरठ्यावर असतानाच या अवकाळी पावसामुळे फळगळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे उत्पादन घटण्याची भीती असून, आधीच वाढत्या कीटकनाशक खर्चाने अडचणीत आलेल्या बागायतदारांसाठी हा आणखी एक मोठा फटका ठरला आहे.पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून, परिणामी उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना रात्री जागून काढावी लागली. तालुक्यातील देवगड जामसंडे, खुडी, कोटकामते, मिठबाव, हिंदळे, नारिंग्रे, कुणकेश्वर, शिरगाव , दहिबाव, बापर्डे, वाघोटन, सौंदाळे,आरे, विजयदुर्ग आदी भागात पावसाने दमदार बॅटिंग केली.

स्थानिक शेतकरी, आंबा बागायतदार व नागरिकांनी सरकारकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना पीकविमा आणि मदतीच्या योजनांचा तातडीने लाभ मिळावा, अशीही मागणी होत आहे.