ओला चारा लागवडीचा पायलट प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक- प्रशांत यादव

मंडणगडमध्ये ओला चारा लागवड प्रकल्पाचे उद्घाटन

मंडणगड (प्रतिनिधी):– सोवेली येथील दुग्ध उत्पादक शेतकरी निखिल दळवी यांनी दुग्ध व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने चारा लागवडीचा सुरू केलेला पायलट प्रोजेक्ट धाडसी असून वाशिष्ठी डेअरी प्रकल्प या प्रोजेक्टच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी दिली. तसेच चारा लागवडीचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास दिला.

मंडणगड- तिडे येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्स प्रा. लि. चिपळूण व सोवेली येथील दुग्ध उत्पादक शेतकरी व क्रीमसन सॉईल ऍग्रो सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे निखिल दळवी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एकर जागेत शेतकऱ्यांसाठी चारा लागवडीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रकल्पाचे प्रशांत यादव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मंडणगड-तिडे येथील ओसाड माळरानावरील २५ एकर जागेत हिरव्यागार चारा लागवडीचा निखिल दळवी यांनी सुरू केलेला प्रकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे. या प्रकल्पाचा येथील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांना दिला. तसेच वाशिष्ठी दूध संकलन केंद्राच्या बाजूला चारा विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहील, यातून या प्रकल्पाच्या पाठीशी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प खंबीरपणे उभा राहील,

आम्ही जेव्हा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प सुरू केला. तेव्हा मंडणगडमधूनच पहिले दूध वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात आले, याची आठवण करून देतांना आज २ हजार ५०० शेतकऱ्यांच्या माध्यमातून ४ हजार ५०० लिटर दुध संकलित होत आहे. यातून येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होत असल्याचे समाधान आहे. विशेष म्हणजे येथील तरुणांमध्ये काम करण्याची ऊर्जा कौतुकास्पद आहे, या शब्दांत तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

यावेळी यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतांना कोकणातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायात उतरले पाहिजे. भविष्यात दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय होऊ शकतो, असा विश्वास देतांना आधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने हा व्यवसाय केला पाहिजे, असे आवाहन केले. नव्या पिढीला दुग्ध व्यवसायासाठी बँकांनी हात देण्याची गरज आहे, असे यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

उन्हाळ्यात दूध मेंटेन राहण्यासाठी निखिल दळवी यांनी सुरू केलेला चारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे सांगतांना सहकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. यातून रत्नागिरी जिल्हा दुग्ध व्यवसायात अग्रणी बनेल यासाठी प्रयत्न करूया, असे यादव यांनी यावेळी आवाहन केले.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प हा शेतकऱ्यांचा आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आलेख जसा वाढत जाईल तसे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल, असा, विश्वास यावेळी प्रशांत यादव यांनी शेतकऱ्यांना दिला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश दळवी यांनी आपल्या मनोगतात कोकणात दुग्ध व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, तितकेसे यश आले नाही. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दिशा देण्याचे मोठे काम केले आहे. तर आता सोवेली येथील दुग्ध उत्पादक शेतकरी निखिल दळवी यांनी दुग्ध व्यवसायात वाढ व्हायची असेल तर ओल्या चाऱ्याची गरज आहे हे लक्षात घेऊन ओला चारा लागवडीचा सुरू केलेला प्रकल्प धाडसी असून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो, अशा शब्दांत निखिल दळवी यांचे रमेश दळवी यांनी यावेळी कौतुक केले.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांचा अन्नदाता!

दूध उत्पादक शेतकरी शिवाजी माने यांनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आम्हा शेतकऱ्यांना रोजगाराचा मार्ग मिळवून दिला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांचा अन्नदाता असून या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. यामुळेच इथला शेतकरी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसांनी दुधाचे बिल जमा होते. यामुळे इथला शेतकरी समाधानी आहे, असे माने यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच संतोष राणे, कादिवलीचे सरपंच प्रताप माने, तिडेचे उपसरपंच राजेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक करतांना या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांना दिशा मिळाली आहे. तर आता ओला चारा लागवड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे, असे या सर्वांनी नमूद केले.

यावेळी शेनाळे सरपंच विश्वनाथ सावंत, तिडे सरपंच मुमताज धनसे, सुरेश दळवी, यशवंत दळवी, अरविंद भोसले, मोहन दळवी, विनोद दळवी, निखिल मोहन दळवी, नितेश यादव, सदानंद यादव, राजेश साळवी, राजेश राणे, ओमकार महाडिक, भाई मर्चंडे, सुधीर भोसले, जगदीश मालुसरे, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे मॅनेजर प्रदीप मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी उत्पादक शेतकरी निखिल दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. हिरव्या माळरानावर झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर सुखावून गेले होते.