राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना (शिंदे गट) पक्षाला धक्का

 माजी उपसभापती शरद शिगवण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपळूण (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुकाप्रमुख शरद शिगवण यांनी दोन विभागप्रमुख उपविभागप्रमुख, आठ शाखाप्रमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशकर्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्य मानसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी यावेळी दिली.
अजित यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत मित्रपक्ष राष्ट्रवादीला इशारा दिलेला असतानाच नुकतेच उत्तर रत्नागिरीच्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गटाचे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा पक्षप्रवेश खेड येथे झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.
चिपळूण पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद शिगवण यांनी अडीच वर्षांपूर्वी ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला सध्या ते गुहागर विधानसभा मतदारसंघातील ७२ गावांसाठी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. परंतु विकास कामे होत नसल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत तालुका सचिव सचिन घाणेकर, युवा सेना तालुका उपाध्यक्ष शरद भुवड, विभाग प्रमुख योगेश खेडेकर, रमेश नेवरेकर, उपविभाग प्रमुख अनंत कोदारे, संतोष आगरे, शाखाप्रमुख संदीप कदम, काशिनाथ भागडे, सुरेश जावळे, अंकुश घेवडे, रामा रहाटे, प्रमोद म्हापल व सचिन भुवड आदी पदाधिकाऱ्यांसमवेत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित राष्ट्रवादी प्रवेश केला असल्याचे शिगवण यांनी सांगितले.