श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थानचा २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान नारळी पौर्णिमा उत्सव

चिपळूण (प्रतिनिधी) : शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रध्दास्थान, ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमा उत्सव सोमवार दि . २४ ऑगस्ट ते गुरुवार दि .२७ ऑगस्ट या कालावधीत साजरा होत आहे.
नारळी पौर्णिमा उत्सव कालावधीत सोमवार दि २४ ऑगस्ट रोजी श्री जुना काळभैरव मंदिरात रात्रौ १० ते १२ पर्यंत जागर- श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ, ओझरवाडी ग्रामस्थ चिपळूण यांचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामदैवते श्री देव जुना कालभैरव, श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार, श्री देवी जाखमाता (वैश्यवसाहत), श्री देवी ऐकवीरा (वडनाका) यांना पौवते (पवित्रक) अर्पण करण्याचा धार्मिक विधी होईल. बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) येथे रात्रौ १० ते १२ पर्यत जागर- भोई समाज भजन मंडळ (खालची भोईवाडी) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल. गुरुवार दि .२७ ऑगस्ट रोजी सकाळी श्री देवी भवानी व श्री कात्रादेवी (श्री क्षेत्र गांधारेश्वर) यांना पौवते (पवित्रक) अर्पण करण्याचा धार्मिक विधी होईल. त्यानंतर नारळी पौर्णिमा नारळ मिरवणुक दुपारी ३ वाजता श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरातून सवाद्य निघून ब्राम्हण आळी, राऊत आळी गणपती मंदिर, वैश्यवसाहत मध्ये शेट्ये आळी, श्रीराम चौक मार्गे, मुरादपूर मिठागरी मोहल्ला, साळी वाडी, कुंभारवाडी, भोई वाडीमार्गे श्री क्षेत्र गांधारेश्वर जवळील वाशिष्ठी नदीवरिल रेल्वे पुलापर्यत जाईल. तेथे वाशिष्ठी नदीत श्रीफळ अर्पण करुन नारळ मिरवणूक व नारळी पौर्णिमा उत्सव सांगता होईल. गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री जुना कालभैरव सभामंडप येथे नारळी पौर्णिमा संस्कृत दिन निमित्त विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ यांच्या विद्यार्थ्यांचा संस्कृत सुभाषिते, कथा, स्तोत्र, कोडी, संभाषण कार्यक्रम होईल. नारळी पौर्णिमा उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये करण्यात येत आहे.