वाढदिवसानिमित्त दिल्या संजू परब यांना शुभेच्छा
सावंतवाडी | प्रतिनिधी :आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. केसरकर म्हणाले की, संजू परब यांच्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांचं वय त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना राजकारणात खूप मोठं भविष्य आहे. त्यांनी थोडा संयम ठेवल्यास ते खूप पुढे जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाचे
केसरकर यांनी यावेळी साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” या मंत्राचा उल्लेख केला.
ते म्हणाले की, आपण सर्वजण महायुतीत आहोत आणि प्रत्येकाचा मान ठेवला पाहिजे. पण त्याचबरोबर आपला पक्षही वाढवला पाहिजे. हे काम तारेवरची कसरत असते. जेव्हा मी संजूला थोडं शांतपणे घेण्यास सांगितलं, तेव्हा त्याने निश्चितपणे संयम बाळगला. जे लोक माझ्यासोबत काम करतात, ते हळूहळू शिस्तबद्ध होतात, असंही त्यांनी नमूद केलं.
*केवळ रस्ते-पाणी नव्हे, लोकांचा विकास महत्त्वाचा*
केसरकर यांनी संजू परब यांना केवळ रस्ते, पाणी आणि वीज या पारंपरिक कामांवर लक्ष केंद्रित न करता लोकांच्या वैयक्तिक विकासावर काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “समाजाला काय मिळतं, महिला बचत गटांना काय मिळतं, तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून संजू भविष्यात काम करेल अशी मला खात्री आहे.” त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासातही संजू परब यांचं योगदान महत्त्वाचं ठरेल अशी आशा व्यक्त केली.
जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध
यावेळी केसरकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणाबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, “आज सुदैवाने, जिल्ह्यातील तीनही आमदार आणि खासदार एकाच विचाराचे आहेत.” राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्याचा विकास करायला सर्वजण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं, त्याला अभिप्रेत असे काम करून दाखवायचं आहे. तसेच, दोन्ही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब यांनी जिल्ह्याच्या विकासासोबतच संघटना बांधणीचंही चांगलं काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना दीर्घायुष्य आणि जीवनात अनेक पदं मिळोत अशी प्रार्थना केली. येथील हॉटेल मँगोच्या सभागृहात जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.












