कोल्हापूर, दि. 16 – एस्तेर पॅटन हायस्कूलमध्ये 16 ऑगस्ट रोजी ‘मिस एस्तेर पॅटन डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी या शाळेचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून या महोत्सवी वर्षाची सुरुवात या कार्यक्रमाने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सरोजिनी चोपडे मॅडम होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. भारती कदम, डॉ. अमित कामले, कार्यकारिणी के.सी.सी, कार्यकारी चिटणीस मा. दिनानाथ कदम साहेब, अॅड. डी. डी. धनवडे साहेब, रेव्ह. जयकर साहेब, रेव्ह. अघमकर, सौ. सुहासिनी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष दिनी शाळेच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. संस्थापकांच्या योगदानाची आठवण करून देत शाळेच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले. आजी-माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभागी झाल्या. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणासोबत शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती देखील देण्यात आली.
या महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्याचा गौरव करत पुढील काळात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अधिक भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा दिल्या.












