खेड – (प्रतिनिधी)
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मारुती सिताराम सातपुते यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तर्फे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कार्यातील उल्लेखनीय योगदानाच्या मान्यतेपोटी प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 5 ऑक्टोबर रोजी सांगली येथे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. लोंढे यांच्या शुभहस्ते डॉ. सातपुते यांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. डॉ. सातपुते हे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोन्मेषाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवत आहेत.
या सन्मानाबद्दल घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार मा. संदीप मुग्नगाटे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













