राजापूर तालुका पंचायत समिती आरक्षण सोडतीत काही इच्छुकांना धक्का तर काहींना दिलासा

५ जागा सर्वसाधारण
४ जागा सर्वसाधारण महिला
२ जागा नामाप्र महिला
१ जागा नामाप्र
राजापूर (वार्ताहर):  सोमवारी राजापूर तालुका पंचायत समितीच्या एकूण १२ गणांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत काही इच्छुक उमेदवारांना सुखद धक्का मिळाला आहे तर काहींचा हिरमोड झाला आहे. सहा जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्याने व सभापती पदही महिला आरक्षित असल्याने पंचायत समितीवर महिलांचे वर्चस्व रहाणार आहे.
येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पाच सर्वसाधारण, चार सर्वसाधारण महिला, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि एक नागरिकांचा मागास प्रवर्ग असे प्रभाग आरक्षित झाले आहेत. दरम्यान राजापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित झाले असून ताम्हाणे आणि नाटे हे दोन गण त्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजापूरचा पुढील सभापती या दोन गणांपैकी असणार आहे.
राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीला राजापूर लांजा उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, नायब तहसीलदार विलास सरफरे, राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पांडुरंग शिंदे, महसुल अधिकारी मंगेश परांजपे, बाजीराव पाटील यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण १२ गण असून त्यामध्ये वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर, पेंडखले, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश होतो.
सुरवातीला तहसीलदार विकास गंबरे यांनी आरक्षण कसे काढले जाणार याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शालेय मुलांच्या हस्ते सोडत काढण्यात आल्या आणि राजापूर पंचायत समितीच्या एकूण १२ गणांचे आरक्षण काढण्यात आले.
या जाहीर झालेल्या आरक्षणा नुसार वडदहसोळ, रायपाटण, धोपेश्वर, पेंडखले, कातळी हे सर्वसाधारण गण तर अणसुरे, साखरी नाटे, तळवडे, केळवली हे चार गण सर्वसाधारण महिला म्हणून जाहीर झाले. तर नाटे आणि ताम्हाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आणि जुवाटी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित झाले.
राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे यापूर्वीच जाहीर झाले असून त्या प्रभागात येणाऱ्या नाटे आणि ताम्हाणे पंचायत समिती गण राजापूरचा पुढील सभापती ठरवतील हे निश्चित झाले आहे.
मनाजोगे आरक्षण पडल्याने अनेकांना नशिबाने साथ दिली तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निराशा पडली. तालुक्यातील वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर, पेंडखले, कातळी आदी पंचायत समिती गणात मोठी चूरस निर्माण झाली असून तेथे इच्छुकांची भाऊ गर्दी पहावयास मिळणार आहे. तर उर्वरित पंचायत समिती गणात मनाजोगे आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निराशा आली आहे.
राजापूर पंचायत समिती आरक्षण
१०१) वडद हसोळ – सर्वसाधारण
१०२) रायपाटण – सर्वसाधारण
१०३) तळवडे – सर्वसाधारण, महिला
१०४) ताम्हाणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
१०५) केळवली – सर्वसाधारण, महिला
१०६) जुवाटी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१०७) धोपेश्वर – सर्वसाधारण
१०८) पेंडखले – सर्वसाधारण
१०९) नाटे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
११०) साखरीनाटे- सर्वसाधारण, महिला
१११) अणसुरे – सर्वसाधारण, महिला
११२) कातळी – सर्वसाधारण