संगमेश्वर तालुका पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीत अनेकांच्या ‘स्वप्नांचा’ चुराडा

*मनासारखे आरक्षण न पडल्याने अनेकांचा झाला हिरमोड*
*तर मनासारखे आरक्षण पडल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद*
 देवरूख:

संगमेश्वर तालुका पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत सोमवारी देवरूख येथील पंचायत समितीच्या सभागृहात जाहीर झाली. या आरक्षण सोडतीत अनेकांच्या ‘स्वप्नांचा’ चुराडा झाला आहे. मनासारखे आरक्षण न पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तसेच मनासारखे आरक्षण पडल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद झाल्याचे चित्र दिसून आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संगमेश्वर पंचायत समिती १४ गणांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले असून सात गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. तर दाभोळे गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात प्रंत विश्वजीत गाताडे, तहसिलदार अमृता साबळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, नायब तहसिदार रामभाऊ गिरी, सुदेश गोताड, देवदास खेडेकर उपस्थित होते. यावेळी आभा रोहित पाठक या विद्यार्थीनीने चिठ्या काढल्या. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी ७ गण महिलांसाठी राखीव आहेत.

तर एक अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव आहे. तर उर्वरीत सहा गणात पुरूष उमेदवारांना संधी मिळणार आहे. परंतु या आरक्षण सोडतीनंतर अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली होती परंतु आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संपुर्ण चित्र बदलले आहे. धामापुर तर्फे संगमेश्वर, धामणी, माभळे, निवे बुद्रुक, हातीव, कोंडगाव या गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. तर आरवली, कडवई, परचुरी, साडवली या गणात सर्वसाधारण स्त्री, मुचरी, कोसुंब हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव आहे. तर कसबा संगमेश्वर हा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव आहे. तर दाभोळे गण अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीनंतर ज्यांच्या मनासारखे आरक्षण पडले आहे. त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.