राजापूर नगर परिषद निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या भाजपाकडून मुलाखती

लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी पार पडल्या मुलाखती

राजापूर । प्रतिनिधी : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाकडून शनिवारी या निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
भाजपाचे प्रदेश सदस्य व पक्ष निरीक्षक अतुल कालसेकर व माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालयात या मुलाखती पार पडल्या.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांकडून याची जोरदार मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक आघाडी करून लढण्याचा निर्णय शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहिर करण्यात आला आहे. तर महायुतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र भाजपाकडून या निवडणूकीची मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली आहे.
शनिवारी भाजपाचे पक्ष निरीक्षक अतुल काळसेकर व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी राजापूर नगर परिषदेच्या या निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या शहरातील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्षपदासह शहरातील दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी मुलाखती दिल्या आहेत.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे, शहर अध्यक्ष किरण शिवलकर आदींसह भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.