खेड :
शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांच्या निधनाने संपूर्ण खेड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे. शांत, स्थिर, धार्मिक आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्व असलेल्या लिलाबाई कदम यांचे निधन ही कदम कुटुंबासाठी अपरिमित भरून न निघणारी पोकळी आहे. या मातृवियोगानंतर सांत्वनासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना रामदास कदम अत्यंत भावूक झाले. आपल्या भावना दाबू न शकल्याने त्यांनी मनातील वेदना शब्दांत व्यक्त करत म्हटले —
“स्वामी तिन्ही जगाचा… पण आई विना माणूस खरोखरच भिकारी असतो.”
यावेळी कदम पुढे म्हणाले की, “आई ही माणसाच्या आयुष्याची खरी शक्ती असते. आईच्या आशीर्वादाने माणूस कितीही संकटे पेलू शकतो. आज माझ्या आयुष्यातून ही सदैव सोबत राहणारी शक्ती निघून गेली आहे. हा रिकामा आलेख भरून काढणे अशक्य आहे.”
भाईंच्या मातोश्रींच्या जाण्याची बातमी समजताच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर कदम निवासस्थानी दाखल झाले. सर्वांनी कदम कुटुंबाला सांत्वनपर भेट देत दुःख व्यक्त केले. अनेकांनी लिलाबाई कदम यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांचे साधेपण, कष्टाळूपणा आणि जिव्हाळा आठवला. लिलाबाई कदम या संपूर्ण आयुष्यभर कुटुंबाचा आधारस्तंभ राहिल्या. मोठे राजकीय दायित्व सांभाळणाऱ्या रामदास कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी त्या नेहमी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनाने कदम कुटुंबासह खेड परिसराला आईसमान व्यक्तिमत्त्वाचा आधार हरपल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.













