महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपउपांत्य पुर्व फेरीत धडक
काझीपेठ, तेलंगणा : येथील रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांनी उपउपांत्य पुर्व फेरीमध्ये प्रवेश केला. यासह पुरुष गटात कोल्हापूर, विदर्भ, रेल्वे, पॉंडेचेरी, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा तर महिला गटात विदर्भ, ओडिशा, कोल्हापूर, विमानतळ (Airport), पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या संघाचा समावेश आहे.
रेल्वे ग्राऊंड येथे झालेल्या स्पर्धेत मंगळवारी (ता. १३) झालेल्या सामन्यात महिला गटात महाराष्ट्राने उत्तरप्रदेशवर १ डाव ३४ गुणांनी (४४-१०) दणदणीत विजय मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. यामध्ये ड्रीमरनद्वारे ८ गुण मिळवले. विजयी संघाकडून सरीता दिवा (२.५० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), रेश्मा राठोड (२ मि. संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (१.१० मि. संरक्षण व १४ गुण), संध्या सुरवसे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ करत मोलाची कामगिरी बजावली. तर अंजु यादव (१ मि. संरक्षण), शिवानी (२ गुण) यांनी चांगला खेळ केला.
महिला गटात कोल्हापूरने बिहारचा १ डाव ५० गुणांनी (५६-६) पराभव केला. त्यात कोल्हापूरकडून अमृता बाबासो (१.२०, ३.४० मि. संरक्षण व १४ गुण), श्रावणी लक्ष्मुण (५.४० मि. संरक्षण व १० गुण), श्रेया राजगोंडा (६ गुण) यांनी उत्कृष्ठ खेळ केला. पराभूत बिहारकडून रिया रानी (१ मि. संरक्षण) हिने चमकदार कामगिरी केली.
महिला गटात चुरशीच्या झालेल्या हरयाणा विरूध्द मध्य भारत सामन्यात २४-२४ असे समसमान गुण झाले. यामध्ये हरयाणाकडून मनेश (२.२०, २.२० मि. संरक्षण व २ गुण), आंचल (३.१० मि. संरक्षण), खुशबू (६ गुण), काफी (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर मध्य भारतकडून रोहिणी (३.२० मि. संरक्षण व ४ गुण), अक्षरा (१.५०, १.२० मि. संरक्षण), इशा (८ गुण) यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले.
पुरूष गटात महाराष्ट्राने उत्तरप्रदेश संघाचा १० गुण आणि ५ मिनिटे (२५-१५) राखून पराभव केला. विजयी महाराष्ट्राकडून प्रतिक वाईकर (२ मि. संरक्षण), सुयश गरगटे (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), ऋषिकेश मुरचावडे (२.१० मि. संरक्षण), निहार दुबळे (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर उत्तरप्रदेशकडून आशिष (२ मि. संरक्षण व २ गुण), रोहित पाल (१.३० मि. संरक्षण व २ गुण), मोहिती पाल (४ गुण) यांनी चांगली कामगिरी केली.
कोल्हापूर संघाने त्रिपुरावर १ डाव ४३ गुणांनी (४९-६) मात केली. कोल्हापूरकडून विराज गलगटे (१.४० मि. संरक्षण), राजवर्धन (२.१० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जामदार (१० गुण) यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर त्रिपुराकडून सागर मिहा आणि अभिजी नाम्हे यांनी आक्रमणात प्रत्येकी २ गुण मिळवले. उर्वरीत खेळाडूंना चांगला खेळ करता आला नाही.
तत्पुर्वी, काल (ता. १२) सायंकाळी झालेल्या सामन्यात पुरूष गटात महाराष्ट्राने जम्मु काश्मिरचा १ डाव ३४ गुणांनी (४८-१४) पराभव केला. त्यात विजय शिंदे (२.५०, १.२० मि. संरक्षण), सुयश गरगटे (३ मि. संरक्षण), शुभम थोरात (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), रुद्र थोपटे, प्रतीक वाईकर यांनी प्रत्येकी ६ गुण मिळवत चांगला खेळ केला.
तसेच महिला गटात महाराष्ट्राने चंदिगडचा १ डाव ३० गुणांनी (४२-१२) असा पराभव केला. त्यात श्वेता नवाले (१.५०, १.५० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (२.२० मि. संरक्षण व २ गुण), प्रियांका इंगळे (१.५० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. तर चंदिगडकडून रितू (१ मि. संरक्षण व २ गुण) हिन चांगला खेळ केला.













