राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी (डिपीआर) अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभाग क्र. ९ व १० मधील हे काम करताना रस्ते खोदण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. मात्र या खोदाईमुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रभाग क्र. १० च्या नवनिर्वाचित नगरसेविका साजिया हनीफ काझी यांनी नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संभाव्य समस्या लक्षात घेता त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी काझी यांनी नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हनिफ काझी यांच्या राजकीय वारसा घेवून नगर परिषदेत आलेल्या नगरसेविका साजिया काझी यांनी नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता तत्परतेने आपल्या भागातील समस्येला वाचा फोडण्यासाठी पुढे येत जागृत लोकप्रतिनिधीचे दर्शन घडविले आहे.
सद्यस्थितीत प्रभाग ९ बागकाझी, ओगलेवाडी, दिवटडेवाडी आणि प्रभाग १० मधील कोंढेतड येथे पिण्याच्या पाण्याच्या (डिपीआर) अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. मात्र खोदाईनंतर रस्त्यात मोठया प्रमाणात माती आणि कचरा साचलेला आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे मातीची प्रंचंड धुळ उडत असून तेथील नागरिकांच्या घरात, पिण्याच्या पाण्याच्या भांडयात आणि खाद्यपदार्थांवर जात आहे. या वाढत्या धुळीमुळे सद्यस्थितीत लहान मुले, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो.
तरी संबधीत कंत्राटदाराला तातडीने सूचना देवुन या दोन्ही प्रभागातील रस्त्यांवर आठवडयातून किमान तीन वेळा पाणी मारण्यात यावे किंवा रस्ता दुरूस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी न. प. ने पाणी टँकरचा वापर करावा. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्ष असलेले हनिफ काझी हे अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय राहिलेले आहेत. त्यांचाच हा समाजकार्याचा वारसा पुढे नेताना नगरसेविका साजिया काझी पाहायला मिळत आहे. काझी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून ते मार्गी लावण्यासाठी तत्परतेने उचलेले पाऊल याचे नागरिकांतून कौतुक होत आहे.











