​मळगावमध्ये रंगली कराओके गायन स्पर्धा : तन्वी गोसावीची बाजी

सावंतवाडी । प्रतिनिधी :

मळगांव येथील कला आणि संगीत क्षेत्राला नवा मंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘उदय जामदार व अचानक मित्र मंडळ’ तसेच ‘अचानक महिला मित्र मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली पहिलीवहिली भव्य कराओके गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. मळगावच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तन्वी गोसावी हिने आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

​मळगाव आणि परिसरातील हौशी गायकांसाठी ही स्पर्धा पर्वणीच ठरली. अभिषेक परब, प्रितेश दाभोलकर, काव्या गावडे, अजित सावंत, अनिल यादव, प्रशांत मांजरेकर, गौतम सावंत, मुग्धा गोसावी, पांडुरंग बुगडे, ओमकार मेस्त्री, गायत्री वाळवे, सुभाष सावळ, सुनील गोवेकर, नेहा भांगले, संदीप खानोलकर आणि मंदार बर्डे अशा अनेक स्पर्धकांनी हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करून स्पर्धेत रंगत भरली.

​ अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत तन्वी गोसावी हिला प्रथम क्रमांकाचे ३,३३३ रुपयांचे रोख पारितोषिक (पुरस्कर्ते: हनुमंत पेडणेकर) देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे २,२२२ रुपयांचे पारितोषिक स्वराज धुरी (पुरस्कर्ते: बाळू गावडे) याने पटकावले, तर तृतीय क्रमांकाचे १,१११ रुपयांचे पारितोषिक प्रितेश दाभोलकर (पुरस्कर्ते: अमर वेंगुर्लेकर) यास प्राप्त झाले.

​याव्यतिरिक्त सुनील गोवेकर, मुग्धा गोसावी आणि अजित सावंत यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

​परीक्षण आणि सूत्रसंचालन
संगीताचा दर्जा आणि सादरीकरण या निकषांवर अमित लाखे यांनी परीक्षक म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन मारुती पाटील यांनी केले. अचानक मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे मळगाववासीयांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.