वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन या संस्थेकडून मानपत्र देऊन सन्मान
संतोष कोत्रे
लांजा -: तालुक्यातील आरगावचा सुपुत्र, बाल जलतरणपटू रेयांश खामकर यांच्या दमदार कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन या संस्थेने घेतली असून इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या शानदार सोहळ्यात रेयांशला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
लांजा तालुक्याचा सुपुत्र असलेला रेयांश दिपक खामकर याने स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत विश्वविक्रमावर आपले नाव कोरले आहे. बालवयात त्याने जलतरण स्पर्धा गाजविल्या आहेत. जलतरण मधील असलेल्या त्याच्या चमकदार कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांश खामकर यांचा सत्कार करण्यात आला होता.
दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत अवघ्या ७ वर्षे २ महिन्याच्या रेयांशने अरबी समुद्रात ३० किलोमीटरचे अंतर ७ तास ३० मिनिटे ११ सेकंदात पूर्ण केले होते. अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा विश्वविक्रम रेयांश याने केला आहे. त्याच्या या पराक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन या संस्थेने केली आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे झालेल्या शानदार सोहळ्यात रेयांशला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शानदार कामगिरी बद्दल रेयांश खामकर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












