सन २०२५-२६ आर्थिक वर्षात राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची यशस्वी घौडदौड;

 अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी मांडला प्रगतीचा लेखाजोखा
२९ कोटींचा एकत्रीत व्यवसाय
२ कोटी ७७ लाखाचा ठोबळ नफा
सलग ९ वर्षे ‘शून्य टक्के’ एनपीए राखण्याची परंपरा कायम;
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. संस्थेने यंदा २९ कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला असून २ कोटी ७७ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे, सलग ९ वर्षे ‘०% नेट एनपीए’ राखण्याची आपली गौरवशाली परंपरा संस्थेने याही वर्षी कायम राखली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना मांडवकर यांनी पतसंस्थेच्या ताळेबंदातील ठळक आकडेवारी सादर केली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत संस्थेने सर्वच स्तरावर मोठी झेप घेतली आहे. पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय मार्च २०२५ मध्ये १३२ कोटी ८२ लाख असलेला व्यवसाय २२% वाढीसह आता मार्च २०२६ अखेर १६१ कोटी ४ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
सभासदांच्या वाढत्या विश्वासामुळे ठेवींमध्ये १७% वाढ होऊन त्या ९१ कोटी ४३ लाख झाल्या आहेत. कर्ज वाटपातही यावर्षी २८% ची मोठी वाढ झाली असून, तो आकडा ६९ कोटी ६० लाख रुपयांवर गेला आहे. तर संस्थेच्या सभासद संख्येत १०% वाढ होऊन मार्च २०२६ अखेर सभासद संख्या १५,९०६ इतकी झाली आहे. संस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा अखेर २ कोटी ७७ लाख ढोबळ नफा, तर १ कोटी ८७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे सांगितले.
पतसंस्थेची कर्ज वसुली ९९% असून, भांबेड आणि साखरपा शाखांनी १००% वसुली करून नवा आदर्श निर्माण केला आहे. पाचल, ओणी, भू, कोंड्ये, सागवे, आडीवरे आणि सापुचेतळे शाखांची वसुलीदेखील ९९.५०% पेक्षा जास्त आहे. संस्थेचा सीडी रेशो ६६% इतका समाधानकारक आहे. वसुल भागभांडवलामध्ये देखील १७ टक्केने वाढ होवून वसुल भागभांडवल ४ कोटी ८९ लाख झाले आहे. त्याचबरोबर निधीमध्ये तब्बल २६ टक्के इतकी वाढ होवून त्या ८ कोटी ९१ लाख झाल्या आहेत. गुंतवणूक ३५ कोटी ६८ लाख इतकी असून खेळते भागभांडवल १०९ कोटी ४३ लाख इतके झाले आहे.
सभासदांना जलद सेवा देण्यासाठी पतपेढीने कोअर बँकिंग (CBS) प्रणाली स्वीकारली असून आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस अलर्ट आणि मिनी एटीएम यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच क्युआर कोड आणि मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची
माहिती मांडवकर यांनी दिली. पतसंस्थेच्या ठाणे, मुंबई या भागातील सभासदांना संस्थेशी जोडण्यासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण कोकण विभागभर वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच त्याला मंजूरी मिळेल असा विश्वास मांडवकर यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या पारदर्शक कारभाराची दखल घेत ‘बँको’ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा ‘दीपस्तंभ’ पुरस्कार देऊन संस्थेला गौरविण्यात आले आहे. या यशाचे श्रेय अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि हितचिंतक सभासदांना दिले आहे.
प्रास्ताविक व स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, ज्येष्ठ संचालक बाळ तांबे, अविनाश नवाळे, रमेश सूद, अनंत मोरवस्कर, सुरेश ऐनारकर, धनेश कोकरे आदी संचालक उपस्थित होते.