लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. हुस्नबानू खलिफे यांचे केले अभिनंदन
राजापूर प्रतिनिधी :राजापुरचे तत्कालीन मुख्याधिकारी व जळगाव शहर महानगर पालिकेचे विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी रविवारी राजापुरला भेट दिली. यावेळी त्यांनी राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नाबानू खलिफे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सन २००७ ते २००९ या कार्यकाळात ढेरे यांनी राजापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर काम केले होते. कायमच शहर विकासाचा दृष्टीकोन ठेऊन काम करणाऱ्या ढेरे यांनी त्यावेळी राजापूरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविताना शहर विकासाला प्राधान्य दिले होते. शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात ढेरे यांनी पुढाकार घेत ज्या ज्या ठिकाणी रूंदीकरण करणे शक्य आहे त्या ठिकाणी त्यांनी या रस्त्याचे रूंदीकरणे केले होते. त्यावेळच्या त्यांच्या दुरदृष्टीचा आज शहरवासीयांना फायदा होत आहे. एक अभ्यासू आणि आक्रमक प्रशासकिय अधिकारी अशी ढेरे यांची ओळख आहे. राजापूर शहरवासीयांनी आपल्याला त्या काळात मोलाचे असे सहकार्य केल्याने राजापुरात केलेले काम आजही आठवणीत असल्याचे ढेरे यांनी सांगितले. यावेळी ढेरे यांनी मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या कार्यकाळातील आठवणीही जागवल्या.
रविवारी राजापुरात आलेल्या ढेरे यांनी नगर परिषद कार्यालयात जात लोकनियुक्त नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. शहराच्या कोणत्याही विकासात्मक कामात व प्रशासकिय कामात कधीही सांगा आपण नक्कीच सहकार्य करू अशी ग्वाहीही ढेरे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, ज्येष्ठ पत्रकार व नगरसेवक महेश शिवलकर, नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी ढेरे यांनी राजापूरचे माजी नगराध्यक्ष सुरेश उर्फ बाबूराव कोळेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. बाबुराव कोळेकर यांचे काही महिन्यापुर्वीच निधन झाले. ढेरे यांच्या मुख्याधिकारी पदाच्या कार्यकाळात कै. कोळेकर हे राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते.













