प्रा. डॉ. नंदा जगताप यांच्या ‘घरटे संरक्षण उपकरणा’ला राष्ट्रीय पेटंट!

दापोली अर्बन बँक कॉलेज’च्या शिरपेचात मानाचा तुरा

दापोली(प्रतिनिधी) :

पर्यावरण आणि प्राणिशास्त्र (Zoology) संशोधन क्षेत्रात दापोलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमधील प्राणिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. नंदा भूपाल जगताप यांच्या अभिनव संशोधनाची केंद्र सरकारने दखल घेतली असून, त्यांनी विकसित केलेल्या एका विशेष सुरक्षा उपकरणाला अधिकृत पेटंट (Design Patent) बहाल केले आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण कोकणच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वन्यजीव आणि पक्षी संरक्षणासाठी क्रांतीकारक पाऊल

प्रा. डॉ. नंदा जगताप आणि त्यांच्या चमूने ’सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन’ (Surveillance Device for Nest Protection) म्हणजेच ‘घरटे संरक्षणासाठी पाळत ठेवणारे उपकरण’ विकसित केले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उपकरणाची अधिकृत नोंदणी केली असून, याचा समावेश 495308-001_JOURNAL.pdf या शासकीय दस्तऐवजात करण्यात आला आहे.
निसर्गातील दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, त्यांची अंडी आणि एकूणच वन्यजीवांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचे हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालणारे हे उपकरण जंगलासारख्या दुर्गम भागातही वीजपुरवठ्याशिवाय अविरतपणे काम करू शकते.

प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन आणि संस्था चालकांचे पाठबळ
या अभूतपूर्व यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. नंदा जगताप यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे विशेष आभार मानले. “प्राचार्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाचे प्रोत्साहन आणि संशोधनासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्याचसोबत, संशोधनाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या ’दापोली एज्युकेशन सोसायटी’ने दिलेल्या खंबीर पाठबळामुळे आणि कॉलेजमधील पोषक वातावरणामुळेच या राष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाला गती मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त संशोधन
या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणाच्या निर्मितीमध्ये डॉ. नंदा जगताप (दापोली) यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठातील डॉ. अमिताभ शाद, छत्तीसगडचे संशोधक निशांत घोडे आणि मेरठ येथील डॉ. संगीता शर्मा या राष्ट्रीय पातळीवरील संशोधकांचा मोलाचा सहभाग आहे.
दापोलीला मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. नंदा जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.