पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा ; खरीप हंगामाचे गणित बिघडले 

शेतकरी शेती व बागायतीच्या दुहेरी संकटात 

शिरगाव (प्रतिनिधी) : अल निनो व हवामानातील बदलांचा परिणाम मान्सूनवर झाल्याने यंदा खरीप हंगामाचे गणितच बिघडले असून शेतकरी शेती व बागायतीच्या दुहेरी संकटात सापडला आहे. हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीचे वेळापत्रक बदलत असून शेतकऱ्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत अपेक्षित पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने भातशेती, बागायतीतील मशागतीची कामे, खत व्यवस्थापनाची कामे तसेच नवीन लागवडीची कामे रखडली असून बळीराजाचे कृषी नियोजन विस्कळीत झाले आहे.

यावर्षी सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली असली तरी त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने रोपांची उगवण व वाढ मंदावली आहे. पावसाअभावी अनेक भागांत पेरलेले निम्मेही भात रुजले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भातपिकाची उगवण अपुरी झाली आहे.दुबार पेरणीचे संकटही गडद होत असून खरीप हंगामाचे गणित बिघडत चालले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भात रोपांना पाणी देण्याची वेळ आली आहे. तर अद्याप भात पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाच्या प्रतीक्षेत थांबावे लागत असून खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होत आहे. साधारणतः भात पेरणीनंतर वीस दिवसांनी रोपे लावणीसाठी योग्य होतात. योग्य वेळी लावणी झाल्यास कापणीही नियोजित वेळेत करता येते. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दुसरीकडे, पाऊस नसल्याने आंबा व काजू बागायतीतील मशागतीची कामेही रेंगाळली आहेत. जून महिन्यात झाडांना खते दिल्यास आवश्यक पोषकद्रव्ये योग्य वेळी उपलब्ध होऊन झाडांची वाढ, फुलधारणा व फळधारणा चांगली होते. मात्र, पावसाअभावी खतांचा वापर करता येत नसल्याने बागायतदारांचे नियोजन कोलमडले आहे. तसेच नवीन आंबा, काजू कलमे व इतर उपयुक्त वृक्षांच्या लागवडीची कामेही रखडली आहेत. जूनमध्ये लागवड केल्यास पावसाचे पुरेसे पाणी मिळून झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे शेती व बागायतीच्या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मे महिन्यासारख्या कडक उन्हाची तीव्रता अद्याप जाणवत असून जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी भातशेती, बागायती आणि लागवडीची कामे खोळंबली आहेत. यंदा मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कृषी नियोजन विस्कळीत झाले असून खरीप हंगामाचे गणितच कोलमडले आहे. आता बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.