देवरूख अग्निशमन पथकाची तत्परता; ३१ टन कोळसा वाचवण्यात यश
सुदैवाने जीवितहानी नाही; मोठा अनर्थ टळला
देवरूख (प्रतिनिधी) :
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट घाटात कोळशाने भरलेल्या एका १४ चाकी ट्रकच्या केबिनला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे ३१ टन दगडी कोळसा जळण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत ट्रकचे केबिन आणि तीन टायर जळून खाक झाले आहेत. इंजिन ओव्हरहीट झाल्याने केबिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले त्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड) हा चालक १४ चाकी टाटा ट्रक ३१ टन दगडी कोळसा घेऊन जात असताना आंबा घाटात पहाटेच्या सुमारास या ट्रकला अचानक आग लागली. पहाटे ३.४५ वाजता या घटनेचा कॉल देवरुख अग्निशमन केंद्राला मिळाला. घटनेचे गांभीर्य ओळखून देवरुख नगरपंचायतीची अग्निशामक गाडी पहाटे ४:०७ मिनिटांनी देवरुखहून घटनास्थळाकडे रवाना झाली. अवघ्या काही वेळातच, म्हणजेच पहाटे ४:५० वाजता पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे कर्मचारी सचिन साळवी, राज कुंभार आणि आकाश करंडे यांनी तात्काळ आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

पथकाने अथक परिश्रम घेत सकाळी ६:२० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. ट्रकच्या पाठीमागील भागात असलेला ३१ टन दगडी कोळसा सुरक्षित वाचवण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने ट्रकचे केबिन आणि तीन टायर जळून खाक झाले. आग पूर्णपणे आटोक्यात आल्याची खात्री केल्यानंतर, सकाळी ६:३० वाजता अग्निशामक गाडी घटनास्थळावरून देवरुखसाठी रवाना झाली. त्यानंतर सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी हे पथक देवरुख नगरपंचायत येथे सुखरूप परतले. अग्निशमन पथकाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पथकाला महामार्ग पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
सर्व यंत्रणांनी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य झाले. कोळशाच्या साठ्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात आल्याने मोठा स्फोट किंवा दुर्घटना टळली. महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर आणि चालक कांबळे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव,
आंबा गावातील ‘मृत्युंजयदूत’ विजय पाटील व त्यांची टीम, देवरुख पोलीस ठाण्याचे कर्मचारी, देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि महामार्गावरील इतर वाहनचालक या सर्वांची याकामी मदत मिळाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही.











