कुडाळात ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा साकारणार

इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्गचा भव्य उपक्रम;

 ५० हून अधिक कलाकारांचा सहभाग

कुडाळ: 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्णक्षण असलेला शिवराज्याभिषेक सोहळा तब्बल ३५२ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक विवेक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजू राऊळ, संध्या तेर्से, बंड्या सावंत, उन्मेषा दाभोलकर, रमाकांत नाईक, बापू भोगटे, कमलेश चव्हाण, शिवम म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात ३५२ वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा जशास तसा उभा करण्यात येणार असून, त्या काळातील प्रमुख सरदार व उमरावांच्या उपस्थितीचे वास्तवदर्शी सादरीकरण केले जाणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष तथा रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची परंपरा सुरू करणारे इतिहास अभ्यासक रविराज पराडकर हे उपस्थित राहून शिवराज्याभिषेकाची ऐतिहासिक गाथा उलगडणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार असून हेमंत मुजुमदार हे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा ठरणार असल्याने २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

*५० हून अधिक कलाकार सादर करणार शिवराज्याभिषेकाचा जिवंत आविष्कार*

सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हून अधिक स्थानिक कलाकार शिवराज्याभिषेकाचा रंगमंचीय आविष्कार सादर करणार आहेत. पराडकर यांच्या प्रभावी निवेदनातून उपस्थितांना शिवराज्याभिषेकाची ऐतिहासिक मीमांसा समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त अशा स्वरूपाचा भव्य सोहळा प्रथमच होत असून, शिवकालीन इतिहासाचा नेत्रदीपक अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे