संस्था, शाळा आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केलेले विश्वनाथ सावंत यांचे कार्य कौतुकास्पद: सुरेश दळवी

कोनाळकट्टा येथील ‘एम. आर. नाईक विद्यालया’चे मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत यांचा सेवा निवृत्ती निमित्त भव्य गौरव सोहळा संपन्न

दोडामार्ग | प्रतिनिधी :“मांगेली आणि कोनाळकट्टा शाळेत अत्यंत उत्कृष्ट काम करत सावंत सरांनी संस्था, शाळा आणि विद्यार्थी यांना नेहमी आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानले. विविध उपक्रमांद्वारे त्यांनी आपल्या अष्टपैलू नेतृत्वातून केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. त्यांच्यासारख्या अगत्यशील आणि आस्था बाळगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेशभाई दळवी यांनी केले.

 

माजगावचे सुपुत्र तथा दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा येथील ‘एम. आर. नाईक विद्यालया’चे मुख्याध्यापक विश्वनाथ उर्फ उमेश वामन सावंत हे सुमारे ३० वर्षांच्या प्रदीर्घ आणि आदर्शवत शैक्षणिक सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. या निवृत्तीचे औचित्य साधून कोनाळकट्टा हायस्कूलमध्ये त्यांच्या भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

१५ जून १९९६ पासून कोनाळकट्टा हायस्कूलमधून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास सुरुवात केलेल्या विश्वनाथ सावंत यांनी काही काळ मांगेली माध्यमिक विद्यालयातही आपली सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांनी आदर्श विद्यार्थी घडवितानाच पटसंख्या वाढीसह हायस्कूलच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले.

 

माजगावसाठी सावंत यांच्या अनुभवाचा उपयोग करणार: विक्रांत सावंत

 

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत म्हणाले की, “माजगावच्या या सुपुत्राने आपल्या अष्टपैलू कार्याचा कोनाळकट्टा गावात उमटविलेला ठसा माजगाववासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. दुर्गम भागातील त्यांचे शैक्षणिक कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून, त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आता आम्ही माजगाव गावाच्या विकासासाठी करून घेणार आहोत.” तसेच, ॲड. शामराव सावंत यांनी सावंत सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, प्रशालेने त्यांच्या ज्ञानाचा नंदादीप यापुढेही अविरत तेवत ठेवावा, असे आवाहन केले.

 

मी नेहमीच ग्रामस्थ व संस्थेच्या ऋणात राहीन: विश्वनाथ सावंत

 

सत्काराला उत्तर देताना भावूक होत विश्वनाथ सावंत म्हणाले की, “या प्रदीर्घ सेवाकाळात मला शाळा, संस्था आणि गावाने भरभरून प्रेम दिले. ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभले. विशेषतः संस्था अध्यक्ष सुरेशभाई दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. याच सहकार्यामुळे मी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊ शकलो. या शाळेशी आणि परिसराशी जुळलेले माझे ऋणानुबंध यापुढेही कायम राहतील आणि मी सर्वांच्या ऋणातच राहणे पसंत करेन.”

 

या सोहळ्यात उमेश सावंत यांचा विविध संस्था, मान्यवर आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्रीमती स्वाती नाईक (सचिव, ति. खो. शि. प्र. मंडळ), श्री. बाबुराव धुरी (शिवसेना जिल्हाप्रमुख), कोनाळ सरपंच अमिषा गवस, श्री. विलास नाईक, श्री. सूर्यकांत गवस, श्री. आबाराव लोंढे, श्री. सुधाकर बांदेकर (संस्था सदस्य), श्री. सूर्यकांत नाईक (निवृत्त विस्तार अधिकारी), श्री. आनंद नाईक (माजी मुख्याध्यापक), श्री. संजय माजगावकर, श्री. रूपेश नारेकर, श्री. पांडुरंग लोंढे, तसेच सौ. विजयालक्ष्मी सावंत (पत्नी), वामन सावंत (वडील), विनोद सावंत (भाऊ) आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती अशोक दळवी, शिक्षक प्रवीण ठाकूर, विजय ठाकूर, उदय गवस, प्रसिद्ध दशावतारी कलाकार सुभाष लोंढे व कोनाळ आणि लोंढेवाडी येथील ग्रामस्थ अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अरुण गवस यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीम. आडेलकर यांनी आभार प्रदर्शन संतोष सातार्डेकर यांनी मानले.