खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातीला गुणदे येथील सरस्वती शिक्षण संकुलात अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान आणि कै. डॉ. अशोक आंब्रे स्मृती वाचनालय गुणदे यांच्या संयुक्त विद्यमाने सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे आमदार प्रमोद जठार तसेच भाजप नेते माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसंग्रामचे माजी मुंबई युवक अध्यक्ष सुनिल खाडे, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रांत आंब्रे, सहसचिव व शाळासमिती अध्यक्ष राजेंद्र आंब्रे, रत्नागिरी जि.प. सदस्या सौ. जाई आंब्रे, लोटे एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष ॲड. राज आंब्रे तसेच सर्व सहकारी संचालक व सरपंच उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन, श्री सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. यावेळी विक्रांत आंब्रे यांनी प्रास्ताविकात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी आमदारांचा उल्लेख ‘कोकणचे भाग्यविधाते’ असा केला. गुणदे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे प्रती समाधान व्यक्त केले. आलेल्या पाहुण्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारित करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या सौ. जाई आंब्रे व सहसचिव तथा शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांचा शाल, श्रीफळ व विठ्ठल रखुमाई मूर्ती देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचवेळी माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी कु. अथर्व तांबे, कु. जान्हवी नटे, कु. लवेश आंब्रे, कु. सिमरन चाळके, कु. आर्यन माईनकर, कु. जान्हवी माने, कु. दुर्वेश साळवी तसेच यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरुवर्य, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांना गौरविण्यात आले. याचवेळी ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून मिळणारी रक्कम होतकरू विद्यार्थी म्हणून कु. अथर्व मनोहर तांबे याला गौरविण्यात आले. तसेच इ. आठवी मधील माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण कु. पंकजा नागरगोजे व कु. सोहम साळवी यासह मंथन परीक्षेतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅनरा रोबेकोच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत सायकल वाटप विद्यार्थ्यांस करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी कै. शशिकांत राजाराम आंब्रे यांच्या स्मरणार्थ सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. प्रमुख भाषणामध्ये बोलताना आ. प्रमोद जठार यांनी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले व शाळेतील उपक्रम व संस्कार याबद्दल आनंद व्यक्त केला. सहसचिव व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालक भास्कर आंब्रे, संजय आंब्रे, अशोक आंब्रे, दीपक आंब्रे, राजेंद्र आंब्रे, प्रकाश आंब्रे तसेच गुणदेच्या उपसरपंच सौ. रुणाली आंब्रे, शेल्डीच्या सरपंच सौ. मनाली आंब्रे, डॉ. कै. अशोक आंब्रे, वाचनालयाचे संचालक सदस्य शिवाजी सावंत, संतोष आंब्रे, संतोष पाटोळे व ग्रामपंचायत सदस्य सुभाष आंब्रे तसेच ग्रामस्थ संदेश महामुणकर, सौ. उमा आंब्रे, सौ. अमृता महामुणकर, सागर आंब्रे, सुधाकर आंब्रे, समीर आंब्रे, रामचंद्र आंब्रे, दशरथ आंब्रे, नथुराम आंब्रे, सोहम आंब्रे, प्रणय आंब्रे, स्वप्नील गोठल, राकेश आंब्रे, राजेंद्र जंगम, संदीप आंब्रे, तसेच मुख्याध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.












