लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या शासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक :पालकमंत्री नितेश राणे

‘लोककल्याणाच्या विचारातून ‘महाराजस्व समाधान शिबिर’ 

अशक्य काहीच नाही; इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक प्रश्न सुटतो :मंत्री नितेश राणे यांनी केले कामाचे कौतुक

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातील लाभांश वाटप

 

 

 

 

 

कणकवली; प्रशासनाने वर्षभर लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने काम करून नागरिकांच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवाव्यात. शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नसते, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान’ हे नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवा व योजनांचा लाभ देणारे प्रभावी माध्यम बनले असल्याचे सांगितले.

राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिबिराचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉल्सची, तसेच आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराची पाहणी केली. यावेळी विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते लाभांचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, समाजकल्याण सभापती रुहीता तांबे,नगराध्यक्ष संदेश पारकर, सभापती हर्षदा वाळके, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, देवगड सभापती गणेश राणे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्या शीतल दळवी,सुप्रिया मेस्त्री, सावी लोके,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, गुरुनाथ वर्देकर, नगरसेविका मेघा गांगण, सौ. ठाणेकर,सौ राणे,, नगरसेवक राकेश राणे, बंडू हर्णे, देवगड तहसीलदार शीतल जाधव, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले, मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. महसूल, कृषी, ग्रामीण विकास, वन, मत्स्यव्यवसाय, पंचायत राज, महिला व बालविकास, आरोग्य, समाजकल्याण, सहकार, मुद्रांक व नोंदणी, भूमी अभिलेख, पोलीस विभाग आदी विविध विभागांचा सहभाग असून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल विभागामार्फत विविध प्रकारचे दाखले, गावठाण स्वामित्व सनद, महिला शेतकरी प्रमाणपत्र, निवासी अतिक्रमण नियमितीकरण आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विविध विभागांचे माहिती स्टॉल आणि डिजिटल महसूल सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारातून प्रेरणा घेऊन राज्य शासनाने राबविलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ हे नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविले जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले आणि प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

 

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे शासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने वर्षभर लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने काम करून नागरिकांच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवाव्यात, असे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचे नमूद करत शासनात अशक्य असे काहीच नसते, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर प्रत्येक प्रश्नाचे समाधान होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या सर्व योजनांचा सखोल अभ्यास करून त्या प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, लाभार्थी निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी तसेच दुर्गम भागात ऑनलाइन सेवांमध्ये अडचणी असल्यास नागरिकांना लाभापासून वंचित ठेवू नये आणि आवश्यकतेनुसार ऑफलाइन प्रक्रियेलाही प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

 

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचारातून शासनाचे हे अभियान राबविले जात असल्याचे सांगितले. संत समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ या उक्तीचा उल्लेख करत त्यांनी महसूल समाधान अभियान हे विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम (MERS) अंतर्गत 112 या आपत्कालीन क्रमांकाची माहिती देत कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 112 सेवेंतर्गत बहुतांश घटनांमध्ये पोलीस 9 ते 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत असून सुमारे 80 टक्के प्रकरणांत तातडीचा प्रतिसाद दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येत असून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. महसूल विभाग हा या अभियानाचा समन्वयक विभाग असून महसूल, वन, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमुळे शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.