विल्ये येथे श्री स्वामीसुत महाराज यांच्या जन्मस्थानाच्या नामफलकाचे अनावरण व पवित्र पादुकांचे पूजन सोहळा उत्साहात संपन्न

राजापूर, प्रतिनिधी :श्री स्वामी समर्थ नामाच्या जयघोषाने राजापूर तालुक्यातील विलये येथील परिसर शनिवारी भक्तिमय झाला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मानसपुत्र आणि स्वामी संप्रदायातील थोर संत श्री स्वामीसुत महाराज (हरिभाऊ दाजीबा तावडे) यांच्या जन्मस्थानाच्या नामफलकाचे अनावरण तसेच त्यांच्या पवित्र पादुकांचे पूजन सोहळा विलये येथील दुर्गादेवी मंदिर व दाजीबा यांचे (प्रतापजी निवास), मधलीवाडी येथे मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या सोहळ्यास मुंबई, चिपळूण, चेंबूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्वामी भक्तांची मोठी उपस्थिती लाभली.
श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक विलक्षण आणि श्रद्धास्थान असलेले आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या आश्वासक संदेशातून त्यांनी भक्तांना श्रद्धा, सबुरी आणि सदाचाराचा मार्ग दाखविला. अक्कलकोट येथे त्यांनी केलेल्या आध्यात्मिक कार्यामुळे त्यांच्या चरणी आजही असंख्य भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या कृपाछायेत अध्यात्माचा प्रसार करणारे श्री स्वामीसुत महाराज हे स्वामी समर्थ संप्रदायातील अत्यंत पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात
या सोहळ्यास प. पू. मौनी महाराज (नागपूर) यांच्यासह श्री विजय हरिभाऊ नलावडे, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मुंबईपुरी गादीचे मठाधिपती तसेच श्री स्वामीसुत महाराज यांचे वंशज, यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत पवित्र पादुकांचे पूजन करण्यात आले. जन्मभूमीच्या नामफलकाचे अनावरण झाल्याने विलये गावाच्या आध्यात्मिक वारशाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
विलये येथील माता दुर्गादेवी मंदिरात पादुका पूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भजन सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर स्वामी नामघोषाने दुमदुमून गेला. भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तांच्या उपस्थितीने आणि नामस्मरणाने संपूर्ण वातावरण ‘स्वामीमय’ झाले होते.
या सोहळ्याचे आयोजन तावडे परिवार, विलये ग्रामस्थ बंधू आणि श्री स्वामी समर्थ मठ, चेंबूर यांच्या वतीने करण्यात आले होते. नियोजनबद्ध आयोजनामुळे सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. स्वामीसुत महाराजांच्या जन्मभूमीचा गौरव करणारा हा सोहळा विलयेच्या आध्यात्मिक इतिहासात एक संस्मरणीय पर्व ठरला