भारतीयांनी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळून आपल्या समृद्ध भारतीय वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे- डॉ. मिलिंद कुलकर्णी

राजापूर नगर वाचनालयात आयोजित व्याख्यान कार्यक्रम
राजापूर (वार्ताहर): जगभरातील अनेक संस्कृती या कालौघात नष्ट झाल्या मात्र भारतीय संस्कृती आपल्या गुण वैशिष्टांमुळे पाच हजार वर्षांनतरही आपले अस्तीस्व टिकवून  आहे. ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. बदलत्या काळात पाश्चात्त्य अंधानुकरण टाळून, आपल्या समृद्ध भारतीय वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि विचारांचा दैनंदिन जीवनात स्वीकार केला पाहिजे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी येथे केले.
येथील राजापूर नगर वाचनालय आपले शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी ‘भारतीय संस्कृती आणि आपण’  या विषयावर डॉ. कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर, उपाध्यक्ष जयेश हर्डीकर, सहचिटणीस सुहास ओळकर, प्रसिध्द कवी प्रमोद जोशी उपस्थित होते.
 या व्याख्यानात डॉ. कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीचे विविध पैलू आपल्या ओघवत्या वाणीतून उलगडले. जवळ जवळ एक तासाहुन अधिक काळ त्यांनी भारतीय संस्कृतीचे महत्व, ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अनेक ऋषी, मुनी, राजे, महाराजांनी, संत महंतानी केलेला त्याग, बलीदान याची माहिती दिली.
आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, खगोलीय ज्ञान अशा कितीतरी गोष्टी भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या आहेत. संस्कृती म्हणजे केवळ जुन्या रुढी-परंपरा नव्हे, तर मानवी जीवनाला समृद्ध करणारी जीवनपद्धती होय. काळानुरूप संस्कृतीमध्ये कोणते बदल स्वीकारले पाहिजेत, याचे अचूक भान आपली संस्कृती देते. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणापासून आजच्या पिढीला परावृत्त करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आणि जिवंत संस्कृती मानली जाते. येथे विविध धर्म, भाषा आणि सण असले तरी सर्वांमध्ये एकता दिसून येते. संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे, हा उदात्त विचार आपली संस्कृती देते. ज्येष्ठांचा आदर करणे आणि पाहुण्यांना देवासारखे मानणे ही आमची ओळख आहे. जगाला शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचा संदेश भारतीय संस्कृतीनेच दिला आहे. रामायण, महाभारत आणि वेदांसारखे पवित्र ग्रंथ मानवाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवतात. आपल्या संस्कृतीत झाडे, नद्या आणि प्राण्यांना पूजनीय मानून निसर्गाचे रक्षण केले जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी भारताने जगाला ‘योग’ ही अमूल्य देणगी दिली आहे. दिवाळी, होळी आणि गणेशोत्सवासारखे सण समाजात आनंद आणि बंधुभाव वाढवतात. ही संस्कृती मानवाला केवळ भौतिक प्रगतीच नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते. आधुनिक तंत्रज्ञान जरूर स्वीकारावे, पण स्वतःची सांस्कृतिक पाळेमुळे विसरू नयेत. विचारांचे अंधानुकरण करण्याऐवजी विवेकनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे अशी अनेकविध भारतीय संस्कृतीची गुणवैशिष्टये आहेत. त्यामुळेच अनेक परकीय आक्रमणांतरही भारतीय संस्कृती टिकून असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते तालुक्यात १० वी परिक्षेत विज्ञान विषयात प्रथम सिध्देश शिंदे, मराठी विषयात प्रथम समिक्षा बंडगर यांचा तसेच  विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी, वाचक सभासद व नागरिकांचा नगर वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे संचालक, सभासद, वाचक  मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सुहास ओळकर यांनी करून दिला सुत्रसंचालन ग्रंथपाल पद्मजा कारेकर यांनी तर आभार सहा. ग्रंथपाल अनघा करंदिकर यांनी मानले.