३५ वर्षांच्या क्रीडा योगदानाची दखल
राजापूर (वार्ताहर): गेल्या ३५ वर्षांपासून कबड्डी या खेळाशी सातत्याने निगडित राहून खेळाडू, मार्गदर्शक आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे यांना ‘घाटकोपर क्रीडाभूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ क्रीडा योगदानाची दखल घेत घाटकोपर प्रगती मंच या संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
मोहन पाडावे हे राजापूर तालुक्यातील कणेरी गावचे सुपुत्र आहेत. नोकरी च्या निमित्ताने मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्य करताना त्यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. विशेषत: क्रीडा क्षेत्रात त्यांचे अनमोल असे योगदान राहिले आहे. गेली साडेतीन दशके कबड्डीच्या माध्यमातून या खेळाची सेवा केली आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मुळ गावी स्थायिक होत राजापूर प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून त्यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे. कबड्डी क्षेत्रातील विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या असून, खेळाच्या विकासासाठी आणि नव्या पिढीतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘घाटकोपर क्रीडाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
घाटकोपर प्रगती मंच यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘घाटकोपर भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील पाच मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या सर्व मान्यवरांना १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘घाटकोपर भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहे.










