ए बाबू’ची धूम;* आत्या-भाच्याला ‘कोकण कला रील्स स्टार २०२६’ पुरस्कार

 

 

सावंतवाडी :

अस्सल मालवणी भाषेतील विनोदी रील्समधून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सौ. गौरी नितीन बांदेकर व कु. राज उमेश सावंत या आत्या-भाच्याच्या जोडीला ‘कोकण कला रील्स स्टार २०२६’ पुरस्काराने ओरोस येथील पत्रकार भवनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

रीलच्या सुरुवातीलाच ऐकू येणारे ‘ये बाबू…’ हे वाक्य आता त्यांच्या जोडीची खास ओळख बनले असून, सोशल मीडियावर त्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते.

भन्नाट संवाद, अभिनय आणि कल्पक विनोदी सादरीकरणासाठी ही जोडी प्रसिद्ध आहे.

 

विविध रील्स स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिकेही त्यांनी पटकावली आहेत.

कमी कालावधीत मिळवलेली लोकप्रियता, प्रेक्षकांना मनमुराद हसविण्याची कल्पकता आणि मालवणी भाषेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवून दिलेले नवे व्यासपीठ याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स व यशश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

आत्या-भाच्याची ही भन्नाट जोडी आता *‘ए बाबू’* या नावानेच कोकणच्या हास्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे